
पालखेड बंधारा । प्रतिनिधी Palkhed Bandhara
पालखेड बंधारा (Palkhed Bandhara ) येथील निवृत्त तलाठी शिंगाडे यांच्या मीरा माधव पेट्रोलपंपाजवळ पहाटे 4 ते 4.30 च्या दरम्यान रस्त्याने जात असताना बिबट्याने ( Leopard) दर्शन दिल्याचे पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचे येथील कर्मचार्यांनी पाहिले. त्यामुळे नागरिकांमध्ये व शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात झाडी असल्याने तसेच पाणी असल्याने हे बिबटे या परिसरात वावरत असल्याचे शेतकर्यांकडून बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात रघुनाथ गायकवाड यांच्या द्राक्षबागेत बिबट्याचे दर्शन झाले होते. याशिवाय धरणालगत असणारे शेतकरी शामराव गायकवाड यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला होता
.
येथील मारुती फाटा परिसरातही अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची मजा घेणारे मॉर्निंग वॉकवालेसुद्धा आता बिबट्याच्या दहशतीमुळे घाबरून घराबाहेर पडत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. जंगल तोडीमुळे हे बिबटे दिवसेंदिवस मानव वस्तीकडे वास्तव्यास येत असल्याने शेतकर्यांची कुत्रे, मांजर, शेळ्या, बकरी, गाई, म्हशी आदींची शिकार हे बिबटे करत असून या बिबट्यांचा संबंधित खात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.