चोर्‍या थांबवण्याची पोलिसांकडे मागणी

चोर्‍या थांबवण्याची पोलिसांकडे मागणी

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव (Pimpalgaon City) शहरात गेले कित्येक दिवसापासून घरफोडीचे (Burglary) सत्र सुरूच आहे. सोमवार दि.3 मे अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचखेड रोडवरील प्रगीत कॉलनीत भरवस्तीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. त्यात सुमारे 10 हजार रुपयांची रोकड व ऐवज लंपास केला.

महिन्याभरापासून चिंचखेड रोडवर घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात उपनगरातील लोकसंख्या पाच ते सहा हजारांच्या आसपास असून पोलिसांनी (police) रात्रीची गस्त (Patrolling) वाढवावी. तसेच गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले चोरीचे सत्र तत्काळ थांबविण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्या अन्यथा याबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ग्रामपालिका सदस्य अल्पेश पारख (Grampalika member Alpesh Parakh) यांनी दिला आहे.

चिंचखेड रोड परिसरातील बालाजी मंदिर परिसरात प्रगती कॉलनी मधील विजय माधव पोटे अक्षय्य तृतीयेसाठी (Akshayya Tritiya) आपली रुई या गावी गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत काही चोरटे सोमवारी मध्यरात्री बंगल्याची संरक्षण भिंत ओलांडून आत आले. लोखंडी सळयाच्या सहाय्याने घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण भक्कम लोखंडी दरवाजा चोरट्यांना तोडता आला नाही. मागील बाजूच्या खिडकीची काच काढून गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

बेडरूममधील दोन्ही कपाटे तोडली. त्यातील सुमारे 10 हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून देत पोबारा केला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्या घरी घरकाम करणारी बाई आली. तेव्हा चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली. शेजारी लागलीच जमा होऊन विजय पोटे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. ते तासाभरात पोहचले. पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात याच परिसरात चोरीची ही नववी घटना घडली आहे.

चोरट्यांनी पिंपळगाव शहरातील विविध उपनगरांत हात साफ केल्यानंतर मोर्चा चिंचखेड रस्त्याकडे वळविला आहे. गेल्या महिन्याभरात चोरट्यांनी चिंचखेड रस्ता परिसरात नऊ ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यातील काही नागरिकांनी तक्रार दिली तर काहींनी पोलिसांच्या नको त्या चौकशीचा त्रास टाळण्यासाठी गप्प राहिले. पिंपळगाव शहरातील चिंचखेड रस्ता परिसर हा नोकरदार व मध्यवर्गीय नागरिकांचा आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे बहुतांश नागरिक बाहेरगावी गेले आहे. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडीचा सपाट लावला आहे.

Related Stories

No stories found.