कोविड केअर सेंटर सुरू करा

पंचायत समिती सभापती बर्के यांची मागणी
कोविड केअर सेंटर सुरू करा

नांदूर शिंगोटे । वार्ताहर Nandur Shingote

सिन्नरसह तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालय व इंडिया बुल्स येथे असलेले कोविड सेंटरही अपुरे पडत असून त्यावरही अतिरिक्त रुग्ण संख्येचा भार पडत आहे. त्यामुळे दोडी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात अथवा नांदूर शिंगोटे येथे कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

सद्य परिस्थितीत सिन्नरसह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिसरातील अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांना जीव गमवावा लागल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहे.

सिन्नर शहरा पाठोपाठ नांदूर-शिंगोटे ,दोडी बुद्रुक, कणकोरी, मानोरी या गावांत या विषाणूचा जास्त प्रभाव जाणवत असून खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालय व इंडिया बुल्स येथे सुरू असलेले कोविड सेंटर अपुरे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

दोडी बुद्रुक व नांदूर शिंगोटे ही दोन्ही गावे मध्यवर्ती ठिकाण असून दळणवळणाच्या दृष्टीने व आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध होणार असल्याने परिसरातील सुमारे वीस ते तीस गावातील रुग्णांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. तरी शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com