प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल सुरु करण्याची मागणी

प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल सुरु करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल सुरु करावा, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन खरेदी, विविध कर्ज योजनांद्वारे नागरिकांची फसवणूक होत असते. यामध्ये ग्रामिण भागातील नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्हास्तरावर सायबर सेल कार्यान्वित आहेत. या सेल मध्ये दाखल होणार्‍या गुन्ह्यांची संख्या विचारात घेता सायबर सेलमधील नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे फसवणुक केलेल्या गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्यांच्या तपास कार्यात विलंब होतो. तपास योग्य दिशेने होत नसून आरोपी पकडले जात नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे फोफावले असून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल सुरु करण्यात यावा, अशी मागणी मंत्री भुसे यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राज्यात मुंबई पोलीस धर्तीवर राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल कार्यान्वित करुन तेथील पोलीस ठाणे अंमलदार यांचेमार्फत विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंत गुन्ह्यांची नोंद नॅशनल सायबर पोर्टलवर केल्यास गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होऊन आरोपींचा शोध लागेल व तक्रारदारास लवकरात लवकर न्याय मिळेल. तसेच जिल्हा सायबर सेलवरील येणारा अतिरीक्त ताण कमी होईल. म्हणुन राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर सेल सुरु करणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावर उपाय आहे. सायबर गुन्ह्यांत माहितीची चोरी, ई-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, व्हायरस हल्ला, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत. त्याचबरोबर पोर्नोग्राफी, ट्रॅफिकिंग यासारखे काही गुन्हे हे संपूर्ण समाजाच्याच आरोग्यास हानी पोहोचवत असतात. यामुळे भविष्यात या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com