पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव खर्चाची चौकशी करा

सटाणा महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव खर्चाची चौकशी करा

मुंजवाड । वार्ताहर Satna / Munjvad

शहर पाणीपुरवठा योजनेच्या( Water Supply Scheme ) वाढीव खर्चाबाबतच्या प्रस्तावावरच महाविकास आघाडीने ( Mahavikas Aaghadi ) संशय उपस्थित करत हा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याने तो रद्द करून संबंधित कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( District Collector Suraj Mandhare ) यांना निवेदन देत केली आहे.

शासनाच्या मुन्फ्रामार्फत कर्ज उभारणीच्या प्रस्तावावरून महाविकास आघाडीने नगराध्यक्ष सुनील मोरे यांना लक्ष्य केले आहे. शासनाच्या पैशांचा अपव्यय व अपहार होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी या प्रकरणी सक्षम अधिकार्‍याकडून योजनेची सखोल चौकशी व्हावी व शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावरून नगराध्यक्ष व महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे आदी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या मनमानीची तक्रार केली. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी सुटावी यासाठी थेट पुनद धरणातून सुमारे 49.6 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली.

पालिकेने निविदा मागवल्यानंतर 9.97 टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आली. या वाढीव दराच्या निविदेस मंजूर करू नये अशी मागणी करत काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करत नगराध्यक्ष मोरे यांनी बहुमताच्या जोरावर निविदा मंजूर करून योजनेची किंमत 51 कोटी 33 लाख रुपयांपर्यंत वाढवली.

वाढीव कामांच्या नावाखाली पुन्हा शासनाच्या मुन्फ्रामार्फत सुमारे 8 कोटी 17 लाख रुपयांचे कर्ज उभारणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे संदर्भ सादर करण्यात आला आहे. या ठरावास माजी शहराध्यक्ष विजय वाघ व इतर नागरिकांनी हरकत घेतली आहे. वाढीव खर्चाचा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवण्यात आला. तो बेकायदेशीर असल्याचा आरोप आघाडी पदाधिकार्‍यांनी केला आहे.

प्रभारी मुख्याधिकार्‍यांवर दबाव तंत्र

तत्कालीन मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी स्पष्टपणे त्यांचे तांत्रिक मंजुरी मिळण्याकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. नगरपालिकेची आजची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मुन्फ्राकडून कर्ज काढून नगरपालिकेवर विनाकारण बोजा टाकू नये. त्यामुळे विकासकामांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून प्रभारी मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी नगराध्यक्षांच्या दबावाला बळी पडून मुन्फ्रा या वित्तीय संस्थेकडे कर्ज उभारणीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. पालिकेकडे ही योजना राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसतानासुद्धा शासनाची दिशाभूल करून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून न राबवता सटाणा नगरपालिका ही योजना कार्यान्वित यंत्रणा म्हणून मान्यता घेतली.

ही योजना राबवताना शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून कुठल्याही अटी, शर्ती व नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

सखोल चौकशीची मागणी

शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्यात यावी, वाढीव कामांची खरेच गरज आहे का? तसेच यापूर्वीच त्या कामांचा समावेश अंदाजपत्रकांमध्ये का करण्यात आला नाही? वाढीव कामांसाठी 15 वा वित्त आयोग किंवा शासनाकडून इतर शासकीय निधीतून निधी मागणी का करण्यात आली नाही? असे प्रश्न महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांतर्फे उपस्थित करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com