शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी

124 पदे रिक्त
शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी

निफाड। प्रतिनिधी Niphad

भावी पिढी सुसंस्कृत व शिक्षित करणार्‍या तालुक्याच्या ( Niphad Taluka ) शिक्षण विभागात ( Dept of Education ) 1064 पदे मंजूर असतांना अवघे 940 शिक्षक कार्यरत आहे. साहजिक निफाड पंचायत समितीच्या ( Niphad Panchayat Samiti ) शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्‍यांसह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पद्वीवर, उपशिक्षक अशी एकुण 124 पदे रिक्त आहे (posts vacant ).

या रिक्त पदांचा ताण इतर कर्मचार्‍यांवर होवून त्यांना ज्ञानदान करणे अवघड होत आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी होत असतांना देखील अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही होवू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या निफाड तालुक्यातच शिक्षकांची वाणवा दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेल्या निफाड तालुक्यात शिक्षकांची कमतरता ही समस्या अनेक वर्षापासून कायम आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी पदे 6 मंजूर असतांना कार्यरत मात्र 2 आहेत. साहजिकच येथेही 4 जागा रिक्त आहे. तर केंद्र प्रमुखांची 20 पदे मंजुर असतांना अवघा 1 कार्यरत असून 19 जागा रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची 74 पदे मंजूर असतांना 36 कार्यरत आहेत तर 38 जागा रिक्त आहेत.

पद्विधर शिक्षकांची 124 पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात 94 कार्यरत असून 30 जागा रिक्त आहेत. तर उपशिक्षकांची 875 पदे मंजूर असून प्रत्यक्ष कार्यरत 843 आहेत तर 32 जागा रिक्त आहेत. तर गेल्या काही वर्षापासून निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पुर्णवेळ गटशिक्षणाधिकारीच मिळालेला नाही. गत पाच वर्षांपूर्वी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून सरोज अहिरे यांनी पदभार स्विकारला.

मात्र त्यांचेकडे देखील त्यावेळी नाशिक डी.एड कॉलेजचा अतिरिक्त पद्भार देण्यात आला. त्यामुळे अहिरे काही दिवस नाशिक तर काही दिवस निफाड पंचायत समितीला अशी दुहेरी सर्कस त्यांना करावी लागली. त्यांची बदली झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांचेकडे निफाड गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पद्भार देण्यात आला.

साहजिकच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मिळू शकला नाही. त्यातच शिक्षण विभागाचे कामकाज चालले पाहिजे यासाठी अनेक शिक्षकांना विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक अशी कामे करुन आपले शिक्षकाची भुमिका पार पाडावी लागत आहे.

सध्या करोना प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्याने या रिक्त जागांची फारशी कमतरता भासत नाही. मात्र जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरु होईल त्यावेळी मात्र शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त असलेली पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने व संबंधित अधिकार्‍यांनी ज्ञानदानाला अधिक महत्व देत शाळा सुरू होण्यापुर्वी तालुक्यातील रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.

रिक्त जागा भरा

शिक्षण विभागातील रिक्त पदे भरावी यासाठी मी दोन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. माझी नियुक्ती त्र्यंबकेश्वर पंचायत समितीला असून येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. सर्व रिक्त पदांची आकडेवारी वरिष्ठांना कळविली असून शिक्षक देण्याची मागणी केली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी निफाड पंचायत समिती अंतर्गत रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी पदासह शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक या जागा भरण्यात याव्यात.

केशव तुंगार, प्र. गटशिक्षणाधिकारी (पं. स. निफाड)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com