नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रात लागू हाणार नाहीत.यासाठी तात्काळ विधानसभेचे अधिवेशन बोलावून केंद्राच्या निर्णयाला पायबंद घालावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखाने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.

यांसदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात छाजेड यांनी म्हटले आहे की, केंद्राने कायदे केल्यामुळे राज्यामधील अनेक उद्योग-व्यवसायांमध्ये मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार वाढले असून याची महाराष्ट्र कामगार मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.

कॉर्पोरेट घराण्यांच्या सोयीसाठी केलेले कायदे महाराष्ट्रात लागू हाणार नाहीत, असे महाविकासआघाडी सरकारने जाहीर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात राज्यातील श्रमजीवी वर्ग व कामगारांच्या प्रश्नांचाही उल्लेख होणे गरजेचे आहे अशी मागणी महाराष्ट्र इंटकच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आली आहे.

मोर्चातील प्रमुख मागण्या

केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत.

महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रम अंतर्गत श्रमजीवी, कामगार क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावा.

महाराष्ट्र सरकारच्या विविध मंडळ, महामंडळ, शासकीय समितीवर कामगार प्रतिनिधी,संचालक,सदस्य म्हणून इंटकला प्रतिनिधीत्व देण्यात यावे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक पूर्व जाहीर केलेल्या शपथनाम्याची अमंलबजावणी करावी.

महाराष्ट्र इंटक ही राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे व केंद्रीय इंटक जगातील सर्वात मोठी संघटना असूनही कामगार विषयक शासकीय समित्यांमध्ये इंटकला डावलले जात आहे असा स्पष्ट आरोप या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी केला.

कामगारांच्या या तीव्र भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून ना.बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात आले आहे.त्यांनीही ही बाब गांभीर्याने घेतो व पुढे असे होणार नाही,असे आश्वासन दिले असल्याची अशी माहिती जयप्रकाश छाजेड यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या माथाडी बोर्डाच्या फेररचनेत कामगार प्रतिनिधी म्हणून इंटकला डावलण्यात आले आहे.माथाडी बोर्ड बरखास्त करुन फेररचना करुन इंटकला प्रतिनिधीत्व मिळावे ही आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र इंटकचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संम्मेलन बोलावण्यात येणार असून त्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी एच.के.पाटील, अखिल भारतीय इंटकचे अध्यक्ष,डॉ.जी. संजीवा रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात,ना. अशोक चव्हाण,ना.नितीन राऊत,ना.अमित देशमुख, आ.पृथ्वीराज चव्हाण, अ.भा.काँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ यांना तसेच राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे,असेही छाजेड यांनी सांगितले.