विद्यार्थी बँक खाते अट रद्द करा; अन्यथा आंदोलन

छावा संघटनेचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन
विद्यार्थी बँक खाते अट रद्द करा; अन्यथा आंदोलन

निफाड । प्रतिनिधी Niphad

शालेय पोषण आहारासाठी ( School nutrition diet ) विद्यार्थ्यांचे बँकेत खाते ( Bank Account ) काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले असून इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या पोषण आहार योजनेअंतर्गत प्रति महिना 156 रुपये मिळण्यासाठी 1000 ते 500 रु. गुंतवून बँकेत खाते खोलावे लागणार आहे.

त्यासाठी विद्यार्थी व पालकांना बँकेत अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण वि1भागाने बँकेत खाते खोलण्याचे आदेश रद्द करुन विद्यार्थ्यांना कोरडा शिधा द्यावा अशी मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे यांचेसह शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक, विभागीय कार्यालय नाशिक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून 150 रुपयांसाठी 1000 रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ असा प्रकार होत आहे. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणार्‍या विद्यार्थ्यांचे बँक खाते आहे. परंतु हे प्रमाण फार अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे बँक खाते उघडावे लागत आहे. सुट्टीतील 35 दिवसांचे अनुदान 1 ली ते 5 वी 156 रुपये तर 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांकरिता 234 रुपये ठरणार आहे. करोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

त्यामुळे किमान 150 रुपयांच्या निधीसाठी 1000 ते 500 रु. भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा अशी मागणी पालकांकडून होत आहे. मात्र शिक्षण खात्याने काढलेल्या आदेशानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याने विद्यार्थी बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अशातच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता शासनाकडून व्यक्त केली जात असतांना या विद्यार्थ्यांना खाते उघडण्यासाठी शहरात जावे लागणार असून त्यांच्या होणार्‍या गर्दीमुळे करोना संसर्ग फैलावण्याची शक्यता असल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा बँक खाते खोलण्याचा आग्रह कशासाठी धरला हेच समजत नाही. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्याबाबत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी छावाचे शिवा तेलंग, शिवाजी मोरे, विजय खर्जुल उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com