संभाजी चौकात उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्गाची मागणी

व्यापार्‍यांची मागणी
संभाजी चौकात उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्गाची मागणी

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

त्रिमुर्ती चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपुल उभारण्यापेक्षा भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी संभाजी चौकातील व्यापार्‍यांसह रिपाईचे नेते किशोर घाटे यांनी केली आहे.

नवीन नाशकातील त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकादरम्यान उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. संभाजी चौक ते त्रिमुर्ती चौक या दरम्यान अनेक लहान मोठे व्यवसायिक असून उड्डाणपुल उभारल्यानंतर या व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होवून त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. त्याचबरोबर शेकडो वर्षांची परंपरा असलेला म्हसोबा महाराज वटवृक्ष तोडण्यात येणार असून ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

तसेच या पुलामुळे उंटवाडी ग्रामस्थांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे महानगर पालिकेने याठिकाणी उड्डाणपुल उभारण्याचा प्रयत्न करू नये. उड्डाणपुलाचे काम आम्ही होवू देणार नसून वेळेप्रसंगी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनही करू, असा इशारा रिपाईचे नेते किशोर घाटे यांचेसह आशिष शुक्ल, पितांबर पवार, हिरामण बोडके, ज्ञानेश्वर जाधव, समाधान जाधव, नानासाहेब ठाकरे, बापु नागपुरे, ज्ञानेश्वर खरगडे, भाऊसाहेब लगरे, तेजस दुसाने, विनायक वाघमारे, सुमित पत्की यांचेसह व्यापारीवर्गाने दिला आहे.

त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकापर्यंत बनविण्यात येणार्‍या उड्डाणपुलामुळे नागरिकांचे व व्यापार्‍यांचे नुकसान होणार आहे. महानगरपालिकेने हा उड्डाणपुल उभारण्यऐवजी भुयारी मार्ग करावे. उड्डाणपुलाच्या विरोधासाठी वेळेप्रसंगी आंदोलनही करू.

किशोर घाटे, रिपाई नेते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com