नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्राप्त नियतव्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. सदस्यांकडून रस्ते निधीसाठी मोठी मागणी असून, निधी नसतानाही आदिवासी सदस्यांनी निधीची मागणी केल्याने बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांची मोठी कोंडी झाली आहे. मंजूर नियतव्याच्या पाचपट मागणी आल्याने उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांची मोठी कसरत होणार आहे.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातंर्गत 3054 व 5054 या लेखाशिर्षकाखाली मंजूर निधीचे बांधकाम सभापती डॉ. गायकवाड यांच्याकडून नियोजन सुरू झाले आहे. यातच अतिरिक्त प्रशासकीय मान्यता दिल्याने दायित्व वाढले असल्याने दिंडोरी, पेठ, नाशिक,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर या तालुक्यांतील आदिवासी गटांमध्ये रस्ते तसेच रस्ते दुरूस्तीसाठी सदस्यांना निधी प्राप्त होणार नाही.

निधी नसल्यामुळे सदस्यांकडून आरड सुरू आहे. दुसरीकडे बिगर आदिवासी विभागाकडून निधी नियोजनासाठी सदस्यांकडून पत्र मागविले जात आहे. यात सदस्यांनी रस्ते व दुरूस्तीसाठी मोठया प्रमाणात निधीची मागणी केली आहे. 73 सदस्यांपैकी 60 सदस्यांचे पत्र प्राप्त झाले असून या सदस्यांनी 150 ते 200 कोटींच्या कामांची मागणी केली असल्याचे समजते. विशेष : म्हणजे आदिवासी विभागाला निधी नसतानाही या सदस्यांनी पत्र देऊन निधीची मागणी केली आहे.

मागील नियोजनात असमान निधीचे वाटप झालेले असल्याने नाराज सदस्यांनी निधी मिळावा यासाठी कामांची मागणी केली आहे. यातच उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांनी समान निधी वाटपाची घोषणा केली आहे. त्यामुळे अपुरा निधी अन मोठी मागणी यांच्यामुळे उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांची डोकेदुखी वाढली आहे.