भाजीपाल्याला हमी भाव देण्याची मागणी

भाजीपाल्याला हमी भाव देण्याची मागणी

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

सध्या टोमॅटोला व इतर भाजीपाल्यांला ( Tomato & Vegetables ) कवडीमोल भाव असल्याने शेतकर्‍यांनी लागवडीसाठी केलेला खर्च निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी ( Farmers ) मेटाकुटीस आला आहे. टोमॅटोचे उत्पादन खर्च निघत नसल्याने हतबल शेतकर्‍यांनी रस्त्यावर टोेमॅटो फेकून दिले. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या शेतकर्‍यांकडे लक्ष देवून भाजीपाल्याला हमीभाव द्यावा ( Demand guarantee price for vegetables ), अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

यंदा मागील वर्षापेक्षा टोमॅटोची लागवड दिंडोरी तालुक्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. पिक उभे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र टोमॅटोला अल्प दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कोबी, सिमला मिरची, भेंडी, कोंथिबीर, भोपळे, कारले, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकांचेही तीच अवस्था आहे. बाजारपेठेमध्ये आपला माल कवडीमोल विक्री होत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. दोन रुपये किलो कोबी देण्याची वेळ आहे.

गेल्या वर्षी करोना महामारीमुळे शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकाच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती. मात्र करोनाला न घाबरता ज्या शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली होती त्या शेतकर्‍यांना बाजारभाव मिळूत हातात चार पैसे पडले. त्यामुळे यंदाही करोनाच्या परिस्थितीत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची रोपे निर्सरीत बुकिंग करुन लागवड केली. करोना काळात व्यापारी वर्ग येईल का? बाजार समित्या टोमॅटो घेतील का? मजूर मिळकतील का? या विवंचनेत असतानाही शेतकर्‍यांनी टोमॅटो लागवडीचा जुगार खेळला. परंतू सध्या बाजारपेठेत 20 किलोच्या क्रेटसला 50 ते 60 रुपये दर मिळत आहे. या दरातून शेतकर्‍यांचा खर्चही वसूल होत नाही. शेतकर्‍यांनी लागवडीच्या माध्यमातून खेळलेल्या जुगाराला अपयश आले आहे.

अगोदरच शेतकरी करोनाने चिंताग्रस्त झाले असून त्यात आता भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी पुर्णत: वैतागला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांकडे लक्ष देवून भाजीपाल्याला हमीभाव द्यावा व केंद्र सरकारने निर्यात चालू करावी अन्यथा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही.

निलेश शिंदे, शेतकरी वलखेड

सध्या टोमॅटो पिकाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटो बरोबर वांगे सुध्दा फेकून द्यावे लागत आहे. शेतकर्‍यांना सध्या कुणीही वाली नसल्याचे चित्र आहे. शहरामध्ये बाजार बंद आहे तर करोनामुळे अजूनही परिस्थिती गंभीर आहे. म्हणून शासनाने तातडीने शेतकर्‍यांना हमी भाव द्यावा.

अनंत पाटील, शेतकरी वलखेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com