विवाहानंतर वधूची होणारी कौमार्य परीक्षा थांबवा

त्र्यंबक पोलिसांना अंनिसचे निवेदन
विवाहानंतर वधूची होणारी कौमार्य परीक्षा थांबवा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील एका रिसॉर्टवर उद्या (दि. २१) रोजी होत असलेल्या एका विवाहात वधूची कौमार्य परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायदा २०१६ नुसार हे संयुक्तिक नाही. कायद्याद्वारे अशा घटना घडत असताना पोलिसांना (Police) सु-मोटो अधिकार प्रदान केलेले आहेत...

या विवाहात कौमार्य परीक्षा होऊ नये यासाठी पोलिसांनी पावले उचलावी, असे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सरचिटणीस डॉ. टी. आर. गोराणे (Dr. T. R. Gorane) यांनी त्र्यंबक पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, एका उच्चशिक्षित घरातील वधू आणि वर यांचा विवाह नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या एका रिसॉर्टवर आयोजित केलेला आहे. दोघांच्याही जात पंचायतीने लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत वधू पात्र झाली असे जात पंचायतीने निर्णय दिला तर तिला नवऱ्यासोबत जाता येईल. अन्यथा तिच्यासह तिच्या कुटुंबाला जातीतून वाळीत टाकण्यात येणार आहे.

ही परीक्षा होणार असल्याचे खात्रिलायक समजले असून पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत पोलिसांना प्रदान असलेल्या कायद्यानुसार सु-मोटो अधिकार वापरून संबंधितांवर कारवाई करावी असे नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष समीर शिंदे, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com