उपसा जलसिंचन योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

उपसा जलसिंचन योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori taluka ) मडकीजांब, जांबुटके, उमराळे या तीन गावांसाठी उमराळे उपसा जलसिंचन योजना ( lift Irrigation Scheme ) शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून शासकीय मदतीतून या योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असे निवेदन संस्थेचे पदाधिकारी व लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jhirwal ) यांना देण्यात आले.

जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कादवा कारखान्याचे संचालक दिनकर जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वडजे यांच्या नेतृत्वाखाली आ. झिरवाळ यांच्यासमवेत बैठक झाली. जलसिंचन योजनेचे अभ्यासक रमेश वडजे यांनी सांगितले की, या योजनेस पंचवीस वर्षे झाल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनी खराब झाली असून दुरुस्तीची गरज आहे. संपूर्ण योजनेचे नूतनीकरण केल्यास उमराळे, जांबुटके, मडकीजांब या तिन्ही गावांतील 635 हेक्टर शेत जमिनीला या उपसा जलसिंचन योजनेचा लाभ होणार आहे.

यावेळी मोरे, दरगोडे, उपाध्यक्ष निवृत्ती बोराडे, डॉ. पुंडलिक धात्रक, एस. टी. पाटील, शशिकांत गामणे, रघुनाथ गामणे, मडकीजांबचे उपसरपंच बाकेराव बोराडे, उमराळे शेतकरी सोसायटीचे चेअरमन रामदास धात्रक, जांबुटके गावचे उपसरपंच अनिल अपसुंदे, मडकीजांब विकास कार्यकारी शेतकरी सोसायटी संचालक सचिन वडजे, सुनील सोमवंशी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. तिन्ही गावांच्या शेतीच्या विकासासाठी झिरवाळ यांनी शासकीय निधीतून योजना पुनर्जीवित करून अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार द्यावा, अशी मागणी केली.

झिरवाळ यांनी सांगितले की, शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून संपूर्ण तालुक्याचे पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकर्‍यांनी आपले हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रितसर पाणी परवानग्या घ्याव्यात व आपली मागणी नोंदवावी. सर्व धरणांची साठवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.

उमराळे उपसा जलसिंचन योजनेबाबत लवकरच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत शेतकर्‍यांची बैठक आयोजित करून उमराळे उपसा जलसिंचन योजनेला शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी मधुकर नाना वडजे, बाळासाहेब वडजे, भाऊसाहेब वडजे, शरद वडजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com