जुने नाशिक । Old Nashik (प्रतिनिधी)

येथील प्रभाग क्रमांक 14 मधील नानावली भागात मुस्लिम धर्मीयांसाठी दफनभूमी कब्रस्तानचा ठराव रद्द करण्यात आला आहे. हा ठराव रद्द करण्यात यावा व मुस्लीम समाजाला हक्काची दफनभूमी कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी नानावली कब्रस्तान कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून करण्यात आली.

विभागीय महसूल आयुक्त यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेत नानावली कब्रस्तानसाठी मनपा ठराव क्रमांक 390 दिनांक 10.11.2020 रोजी मंजूर केलेला आहे.

मुस्लिम धर्मियांना दफनभूमीची जागा कमी पडत असल्याने ठराव हा मंजूर केला होता, परंतु सदर ठराव हा काही राजकीय लोकांचे ऐकून मनपाने पुन्हा रद्द केल्याने याबाबत नानावली कब्रस्तान कृती समितीने निषेध केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून डीपी प्लान मध्ये कब्रस्तान आहे. जागा पुन्हा ठरावानुसार मंजूर करण्यात यावी, अन्यथा नानावली कब्रस्तान कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदनावर अध्यक्ष तथा माजी उपमहापौर गुलाम शेख, अन्वर पिरजादा, सचिव फय्याज पठाण, रफिक शेख, फजल सय्यद, नदीम मणियार, माजी नगरसेवक हाजी बबलू पठाण, आसिफ मुलानी आदींच्या सह्या आहेत.