गंगापूर कालवा दुरुस्तीची मागणी

भा.नगर, पिंप्री, रसलपूर शिवार पाण्यापासून वंचित
गंगापूर कालवा दुरुस्तीची मागणी

निफाड। प्रतिनिधी Niphad

ओझर, दिक्षी, दात्याणे, सुकेणे, पिंप्रीसह परिसराला वरदान ठरलेल्या गंगापूर कालव्यात अनेक काटेरी झुडपे, गवत उगवले असून अनेक ठिकाणी हा कालवा खचला आहे.

तर कुठे पूल व पोटचार्‍याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणार्‍या या कालव्याची संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गंगासागर पाणी वापर संस्थेचे संस्थापक शिवाजी गबाजी जाधव यांचेसह असंख्य शेतकर्‍यांनी केली आहे.

तालुक्यातील शिवाराचे नंदनवन व्हावे यासाठी कादवा नदीच्या दक्षिण बाजूने गंगापूर कालव्याची निर्मिती करण्यात आली. हा कालवा नाशिकच्या उपनगरासह झोपडपट्टी परिसरातून जात असल्याने कालव्यालगतचे रहिवाशी कालव्यात सांडपाणी, कचरा, कागद, प्लॅस्टिक आदी टाकत असल्याने ही सर्व घाण वाहत या परिसरात येते.

त्यातच गेल्या 20 वर्षापासून कालव्याची दुरुस्तीच करण्यात न आल्याने या कालव्याचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचत नाही. सद्यस्थितीत याच कालव्यावर ओझर, दिक्षी, दात्याणे, थेरगाव, जिव्हाळे, सुकेणे येथील शेतकर्‍यांनी पाणी वापर संस्था स्थापन करुन शिवाराचे नंदनवन केले. परिणामी याच पाण्याचा लाखो रुपयांचा महसूल पाटबंधारे विभागाला मिळतो.

मात्र अतिशय जिर्ण झालेल्या या कालव्याच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याने या कालव्यात दगड-गोटे, गवत, काटेरी झुडपे उगवली असून पाणी प्रवाहात अडथळे निर्माण होऊन या कालव्याचे पाणी पिंप्री शिवारापर्यंत येत नाही.

याच कालव्यापासून रसलपूर, पिंप्री, कोठुरे, पिंपळस गावातील हजारो शेतकरी वंचित असून कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याला मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने तत्पर कार्यवाही व्हावी अशी मागणी गंगासागर पाणी वापर संस्थेचे संस्थापक शिवाजी जाधव यांचेसह परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

हक्काच्या पाण्यापासून शिवार वंचित

गंगापूर कालव्याची निर्मिती होतेवेळी पिंपळस, भा.नगर, पिंप्री, रसलपूर, कोठूरे, काथरगाव परिसरातील शेतकर्‍यांनी कालवा खोदकामासाठी जमिनी दिल्या. प्रारंभी काही वर्ष कालव्याला मुबलक पाणी आल्याने शिवाराचे नंदनवन झाले. मात्र गेल्या दहा वर्षात पाटबंधारे विभागाने कालवा दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे कालव्यात बोरीबाभळींची झाडे उगवली आहेत. अनेक ठिकाणी दगड-गोट्यांचे साम्राज्य दिसून येत असून ठिकठिकाणी हा कालवा खचला आहे. परिणामी कालव्याची वहनक्षमता घटली असून गंगापूर कालव्याचे पाणी शेवटच्या लाभधारकापर्यंत पोहचत नसल्याने कालव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावचे शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित झाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्याची तत्काळ दुरुस्ती करुन पाणी कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाईल यासाठी प्रयत्न करावे.

बंडूदास बैरागी, मा. चेअरमन (वडाळी नजिक सोसायटी)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com