धोकादायक पूल दुरुस्त करण्याची मागणी

दोन वर्षांपूर्वी कठडे वाहून गेले; संबंधित विभागाचे दुर्लक्षाने ग्रामस्थ संतप्त
धोकादायक पूल दुरुस्त करण्याची मागणी

अंबासन । वार्ताहर Ambasan

येथील मोसम नदीवरील ( Mosam River )पुलाचे कठडे ( Bridge walls )दोन वर्षापूर्वी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेले असून पुलावर मोठे खड्डे पडल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या या दुरावस्थेकडे संबधित विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कठडे नसल्याने एखादी अप्रिय घटना घडण्याअगोदर मोसमपुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

अंबासनचा वळवाडे, मोराणे, बिजोरसे आदी गावांच्या संपर्कासाठी अंबासनलगत मोसमनदीपात्रावर बारा वर्षापूर्वी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन आ. उमाजी बोरसे यांनी पाठपुरावा करत या पुलासाठी निधी उपलब्ध केला होता. पुलाच्या निर्मितीमुळे अंबासनसह वळवाडे, मोराणे, बिजोरसे आदी गावातील नागरीकांना धुळे येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा बनला होता तर उमराणे येथे कांदा विक्रीसाठी जाण्याकरिता बिजोरसे, मोराणे, मळगावभामेर आदी गावातील शेतकर्‍यांकरिता हा पूल वेळ व आर्थिक बचत करणारा ठरला आहे. या पुलावरून धुळे तसेच अंबासन, नामपूर येथे ये-जा करण्यासाठी नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. मात्र पुलावर असलेले कठडे महापुरात वाहून गेल्याने तसेच महापुरामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे.

दोन वर्षापूर्वी मोसम नदीने रूद्र रूप धारण केल्याने अंबासन येथील पुलावरून पाणी गेले होते. पाण्याच्या प्रवाह म्हणा किवा नुकतेच झालेले पुलावरील कठडयाचे निकृष्ट काम यात मात्र कठडे तुटून पङले. मात्र कामाच्या उद्घाटनाची कोनशिला तशीचं राहिली. तत्कालीन आ.दीपिका चव्हाण यांनी कठड्यांच्या कामाची मंजुरी आणून उद्घाटन सुध्दा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु महापुराने कठडे वाहून गेले. संबंधित विभागातर्फे या नुकसानीचे पंचनामेदेखील करण्यात आले होते. मात्र दोन वर्षे उलटले तरी अद्याप पुलाची दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे कठडे नसलेला हा पूल पुन्हा धोकादायक बनला आहे.

कठडे नसल्याने पुलावरून नदीपात्रात वाहने पडण्याच्या घटना घडून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. मोसमनदीला पूर आल्यास हा पूल धोकादायक ठरत असल्याने अंबासनसह परिसरातील नागरीक पुलावरून ये-जा करणे टाळतात. एखादी अप्रिय घटना घडण्याअगोदर कठडे त्वरित बसविण्यात येऊन पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी उपसरपंच हेमंत कोर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com