नाशिक । Nashik

नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गावरील प्रसिध्द देवस्थान अंजेनरी येथील हनुमान मंदिराला लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्यामुळे याठिकाणी पुजा साहित्य विक्रीद्वारे उदरनिर्वाह करणार्या पंधरा - वीस आदिवासी बांधवांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोखंडी जाळ्या काढण्यायासंदर्भात या बांधवांनी पोलीस प्रशासनाकडे साकडे घातले आहे.

अंजेनरी येथील हनुमान मंदिरासमोर प्रसाद, फुले व देव देवतांचे फोटो विक्रीच्या टपर्या लावून उपजिवीका करणार्या आदिवासी बांधवांनी नुकतेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या त्र्यंबकेश्वर पोलीस उपअधिक्षकांना निवेदन दिले आहे.

याठिकाणी हे विक्रेते गेल्या 20 वर्षापासुन मंदीराच्या पायर्याजवळ टपर्या लावून यातून मिळणार्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाची उपजिवीका करीत आहे. करोना काळात मंदिर बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान विश्वस्त मंडळींनी लोखंडी जाळ्या लावून आमच्या टपरी बंद केल्या आहे. यामुळे आमचे व्यवसाय बंद पडले असुन घर चालविणे अवघड झाले आहे.

यासंदर्भातील आमच्या भावना मंदिर पुजारी यांना सांगत विनंती करुन काही उपयोग झालेला नाही. आम्ही याठिकाणी टपरी लावण्याचे दर महिन्याला 500 रुपये भाडे भरत असतांना आमच्यावर अन्याय झाला असुन तेव्हा या लोखंडी जाळ्या काढण्यात याव्यात अशी मागणी या आदिवासी बांधवांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अंजेनरी व मंदिर विश्वस्त यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर रंगनाथ बदादे, सुरज बदादे, सागर दिवे, हिरामण बदादे, राजेश दिवे, लहानु बेंडकोळी, देविदास कामडी, मिराबाई निपुंळगे याच्यासह टपरी धारकांच्या सह्या आहे.