सावरगाव । Savargaon (वार्ताहर)

येथील परिसरात काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

शिरवाडे वणी, मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, वावी, नांदूर, सावरगाव, रानवड, खडकमाळेगाव या गावांचा विकास हा ओझरखेड धरणाच्या पाणी फिरल्यामुळे झाला ही गोष्ट नाकारता येणार नाही. परिणामी या गावांचा परिसरातील जलसिंचन व्यवस्था तसेच जलपुरवठा पाण्याच्या आधारावर अवलंबून असलेले व्यवसाय योजना ओझरखेड कालव्याच्या वेळोवेळी येणार्या पाण्यावरच अवलंबून आहे.

निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग हा काही प्रमाणात ओबडधोबड व वर्कस स्वरुपात असल्यामुळे इथल्या भौगोलिक रचनेमुळे या भागात पडणारा पाऊस लगेच वाहून जातो. नैसर्गिक आपत्ती कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळे अधूनमधून दुष्काळ पडणार तसेच पाऊस अनियमित झाला तर दुबार, तिबार पेरणी केल्यानंतर संकटांना बळीराजाला सामोरे जावे लागते आणि ते सुद्धा वगैरे याची शाश्वती राहत नाही.

येथील शेतकरी काबाडकष्ट करुन पावसाच्या अंदाजानुसार पेरणी करत असतो. अफाट परिश्रम व मेहनत करुनही कधी-कधी कमी पाण्याअभावी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येत असते. सद्यस्थितीत परिसरात गहू, हरभरा, उन्हाळी मका व जनावरांसाठी चारा या पिकांना पाण्याची गरज असून ठळक भागात पाण्याचे प्रमाण चांगले राहत असून काही भागात पाण्याचा तुटवडा नेहमीच भासत असतो.

काही ठिकाणी विहिरींच्या पाण्याची पातळी खाली गेली असून शिरवाडे वणी परिसरात जलपुरवठा योजनासुद्धा पाणी कमी असल्यामुळे चालू बंद होत असतात.

गहू, हरभरा या पिकांना सध्या थंडी जाणवत असून पाण्याची गरज असून पुढील काळात पाण्याअभावी येणार्या अडचणी दूर करण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले तर पाटबंधारे विभागाला सुद्धा काही प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो व परिसरात पाणी फिरल्यामुळे पुढील काळात सिंचन व्यवस्थेला येणारा अडथळा आत्ताच दूर होईल.

किमान जून महिन्यापर्यंत तीन आवर्तनाचे नियोजन करुन पहिले आवर्तन ओझरखेड कालव्याला सोडण्यासाठी तसेच धरणातील पाणी नियोजनासाठी आढावा बैठक घेऊन रब्बी हंगामातील पिकांना वाचवण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व व्यवसायिकांनी केली आहे.