सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या!

कोचिंग क्लासेस संघटनेची मागणी
सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या!

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातिल अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असून ते बघता खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत प्रत्येक वर्गाची २० विद्यार्थ्यांची एक बॅचला परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन, नाशिक संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे...

कोचिंग क्लासेस संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेत त्यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले व चर्चा केली.

निवेदनात म्हटले आहे की, खाजगी कोचिंग क्लासेस करोना संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे नाशिक मधील अंदाजे लहान-मोठे हजारहुन क्लासेस बंद अाहेत. त्यामुळे क्लास चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यात आता करोना प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस लवकर सुरू कराण्यास परवानगी द्यावी.

कोचिंग क्लासेसची तुलना शाळा-महाविद्यालया बरोबर न करता व्यवसाय समजून लवकरात लवकर सुरू करण्याची परवानगी द्यावी. कोचिंग क्लासेस ची शिक्षण उपसंचालक पातळीवर नोंदणी करून घ्यावी.

कोचिंग क्लासेस व्यवसाय 'एमएसएमई'अंतर्गत व्यवसाय समजून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन आमच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास मदत करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.आम्हाला क्लास सुरू करायला परवानगी मिळाल्यास सर्व अटींचे व विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

एका बेंचवर एक विद्यार्थी बसवण्याचे आम्ही आश्वासन देतो. परवानगी दिल्यानंतरही पालकांची, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून सुरळीत क्लासेस सुरू व्हायला बराच वेळ लागेल. त्यामुळे सरकारने क्लासेस सुरु करण्याबाबत सकारात्मकता दाखवावी अशी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.विजय डोशी, खजिनदार प्रा.कुणाल कटारिया, सचिव प्रा.निलेश सुराणा, कायदेशीर सल्लागार प्रा.यशवंत बोरसे आदी उपस्थित होते.

प्रमुख मागणी

- कोचिंग क्लासेस सुरु केल्यास शैक्षणिक सत्र सुरळित होण्यास मदत होईल

- नववी व दहावी, अकरावी व बारावी आणी सीईटीच्या तयारीसाठी क्लास सुरु होणे गरजेचे

करोनामुळे शिक्षणक्षेत्र व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. करोना परिस्थिती सुधारत असून कोचिंग क्लासेस सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

प्रा.विजय डोशी, जिल्हाध्यक्ष कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com