नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नाशिक महापालिकेच्या वतीने मायको सर्कल ते दिव्या अॅडलॅब पर्यंत 120 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या पुलाचे काम करतांना सीटी सेंटर मॉलजवळील अतीप्राचीन म्हसोबा महाराज मंदिर येथील वटवृक्षाला धक्का लावु नये, त्याच प्रमाणे हा वटवृक्ष हेरिटेज ट्री (अतीप्राचिन वृक्ष) म्हणून घोषित करावा, अशी मागणी अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी चंद्रकांत भारमल यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान विश्वस्तांच्या मागणीनुसार वनाधिकारी भारमल यांनी तत्काळ या वटवृक्षाची पाहणी करुन याबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहे. मायको सर्कल ते दिव्या अॅडलॅब दरम्यान दररोज वाहतूकीची कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून पालिकेने 120 कोटीच्या निधीची तरतूद करुन वाय टाईपचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

सीटीसेंटर मॉल जवळील नंदीनी नदीच्या काठालगतच अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिर असून याच मंदिरानजीकच सुमारे अडीचशे वर्षापुर्वीचा सुमारे 9 मीटर व्यासाचा बुंधा असलेला वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष या उड्डाणपूलाच्या कामासाठी तोडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वटवृक्षाला धक्का लावु नये यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी वनाधिकारी चंद्रकांत भारमल यांची भेट घेऊन हा वटवृक्ष वाचविण्यासाठी विनंती केली आहे.

कलकत्त्यातील आचार्य जगदिशचंद्र बोस बॉटनिकल गार्डन मध्ये असलेल्या शंभरी पार केलेल्या महावृक्षांना हॅरीटेज दर्जा देण्यात आला आहे. याच धर्तीवर या महावृक्षाला तसा दर्जा देण्याची मागणी म्हसोबा महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन पालिका आयुक्त कैलास जाधव यांना देखील देण्यात आले. आहे.

यावेळी अध्यक्ष मधुकर तिडके, उपाध्यक्ष दिनकर तिडके, जनरल सेक्रेटरी सदाशिव नाईक, सहसेक्रेटरी रामचंद्र तिडके, विठ्ठलराव तिडके, खजिनदार अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, विलास जगताप, बाजीराव तिडके,माजी नगरसेवक आण्णा पाटील आदी उपस्थित होते.

कोणतेही वृक्ष हे केवळ वृक्ष नसुन ती एक संस्था असते. या वृक्षावर विविध पक्षी येत असतात. या महावृक्षामंळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन व सावली मिळते. त्यामुळे ते वाचवणे ही काळाची गरज आहे. या वटवृक्षाला हॅरीटेज दर्जा देण्यासाठी सामाजीक वनीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.

चंद्रकांत भारमल, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग