पितृपक्षामुळे पालेभाज्यांना मागणी

पितृपक्षामुळे पालेभाज्यांना मागणी

निफाड। प्रतिनिधी | Niphad

गणेश उत्सवानंतर (ganeshotsav) पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्या व फळभाज्यांना (vegetables) मागणी वाढली आहे.

मात्र मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) पालेभाज्या उत्पादनात घट झाल्याने पालेभाज्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू लागली आहे. तर उत्पादन घटल्याने भाजीपाला पीक शेतकर्‍यासाठी (farmers) डोकेदुखी ठरत आहेत.

पितृपक्षाला प्रारंभ होताच भाजीपाल्याचे दरात मोठी वाढ झाली आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाजीपाला काढण्यापूर्वीच शेतात सडल्याने वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे बाजारभाव वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच पितृपक्षात सर्वच भाज्यांची आवश्यकता भासत असल्याने ग्राहक भाजीपाला खरेदीला अधिक पसंती देत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत आता भाजीपाल्याचे भावात दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या बाजारपेठेत भेंडी 50 रु. किलो, दोडका 60 रु. किलो, गिलके 40 रु. किलो, गवार 80 रु. किलो, डांगर 40 रु. किलो, भोपळा 20 रु. नग, कारले 50 रु. किलो, मेथी 30 रु. जुडी, कोथंबिर 10 रु. जुडी, पालक 20 रु. जुडी, बटाटे 50 रु. किलो, शेपू 20 रु. जुडी, टोमॅटो 30 रु. किलो, वांगे 50 रु. किलो, कोबी 20 रु. नग, सिमला मिरची 40 रु. किलो, हिरवी मिरची 40 रु. किलो, आळुची पाने 20 रु. जुडी, लसूण 50 रु. किलो, वटाणा 80 रु. किलो, फ्लॉवर 20 रु. गड्डा, मुळा 20 रु. नग, काकडी 60 रु. किलो, गाजर 50 रु. किलो, ऊसळ 80 रु. किलो, वाल 50 रु. किलो याप्रमाणे विक्री होत आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात वांगे 30 रु. किलो तर टोमॅटो 20 रु. किलोने विक्री होत होते. तर कारले 30 रु. किलोने मिळत होते. पालेभाज्या (vegetables) व फळभाज्यात अचानक भाववाढ (price hike) झाल्याने शेतमजुरांना जगणे अवघड झाले असून सर्वसामान्य ग्राहकांना या महागाईची (inflation) झळ सहन करावी लागत आहे. तर शेतकर्‍यांनी रात्रंदिवस कष्ट करून व मोठा खर्च करून पिकविलेल्या भाजीपाल्याचे उत्पादनात पावसामुळे (rainfall) मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांना देखील उत्पादन खर्च फिटणे अवघड झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा (heavy rain) फटका शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही सहन करावा लागत आहे.

त्यातच पितृपक्षात पूर्वजांना जेवू घालणे क्रमप्राप्त ठरत असल्याने नैवेद्यासाठी का होईना परंतु भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. बाजारपेठेत पालेभाज्यांना अचानक मागणी वाढल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आणखी 15 दिवस तरी पालेभाज्या व फळभाज्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्यातच अति पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाने उघडीप दिल्यास भाजीपाला उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

सध्या पितृपक्ष सुरू असल्याने भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत भाजीपाला बाजारपेठेत येत नाही. पावसामुळे शेतातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्यात भाजीपाला देखील आलाच. पावसामुळे विक्रीसाठी आणलेला भाजीपाला ओला होवून तो खराब होत आहे. त्यामुळे आम्हालाही दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे. आणखी 15 दिवस भाजीपाल्याचे दर असेच राहण्याची शक्यता आहे.

- विलास आव्हाड, भाजीपाला विक्रेते

कमी वेळात भाजीपाला पीक विक्रीसाठी येत असल्याने व भाजीपाल्याला चांगला दर मिळेल म्हणून महागडी बियाणे घेऊन वेळोवेळी खते, औषधांची मात्र दिली. मात्र आता सतत पडणार्‍या पावसामुळे काढणीपूर्वीच भाजीपाला सडला. परिणामी हातात अत्यल्प पीक आले. त्यामुळे आज बाजारभाव वाढलेले दिसत असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने जमा-खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतीमालाला हमीभाव देवून शेतकरीहिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

- सोपान खालकर, शेतकरी (भेंडाळी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com