कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

नागरी सुविधा समितीचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना निवेदन
कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

मालेगाव । प्रतिनिधी

शहर व परिसरात करोना आजाराने थैमान घातले असून यासाठी आरोग्य विभागाचे कठोर निर्बंध नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यास्तव आरोग्य विभागाने कठोर नियमावली करावी, अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मागील वर्षी करोनाची लस उपलब्ध नसतानादेखील मृतांची संख्या कमी होती. परंतु आज मात्र एकाच कुटुंबातील पाच ते दहा व्यक्ती मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे आरोग्य यंत्रणेवर कुणाचीही पकड नसल्याने महापालिका केवळ दुकाने उघडी असल्यावर दंड वसूल करण्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. अधिकारीवर्ग केवळ आदेश पारित करत असतात. सामान्य रुग्णालयामध्ये बेड शिल्लक असतानादेखील आमच्याकडे कुठलेही बेड शिल्लक नसल्याचे कारण देऊन रुग्णास अक्षरश: काढून दिले जात आहे.

नातेवाईकांना बाधित रुग्णांना नाईलाजाने आटोकाट प्रयत्न करून खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दर घेऊन रुग्णास अक्षरश: लुटले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. मागील वर्षी करोना सेंटरमध्ये सेवकांव्यतिरिक्त कुणासही प्रवेश दिला जात नव्हता. तसेच रुग्णास घरचे जेवणदेखील दिले जात नव्हते व सर्व व्यवस्था करोना सेंटरमधून मिळत होती. आज मात्र करोना रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक थेट बेडपर्यंत जात असल्याने सदर व्यक्ती या करोनाचा प्रसार जोमाने करत आहेत. तसेच सामान्य रुग्णालयासह खासगी करोना सेंटरमध्ये मनमानी कारभार सुरू असून यास्तव आरोग्य विभागाने याची दखल घेऊन रुग्णांची लूट थांबवावी व इंजेक्शनचा होत असलेला काळा बाजार थांबवावा.

तसेच सर्व करोना सेंटरमध्ये सीसीटीव्ही लावणे व त्याचा डिस्प्ले मोकळ्या पटांगणाबाहेर लावल्यास रुग्णांची अवस्था नातेवाईकांना कळू शकेल. तसेच सामान्य व्यक्तींवर कायदा लादला जात असून राजकीय व्यक्तींना मात्र यात सवलत दिली जाते यास जबाबदार कोण? तसेच खासगी करोना सेंटरवर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याचे सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, उपाध्यक्ष शरद ब्राह्मणकर, सचिव भालचंद्र खैरनार, शंकर वाघ, नरेंद्र साकला, फारूख कच्छी, गोपाळ सोनवणे, गजानन येवले, पवन पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com