गिसाका शेअर्स प्रकरणी चौकशीची मागणी

ठाकरे गटाचा आंदोलन इशारा
गिसाका शेअर्स प्रकरणी चौकशीची मागणी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना अवसायानात असतांना तो वाचविण्यासाठी गिरणा बचाव समितीच्या नावाखाली गिरणा-मोसम शुगर अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कंपनी स्थापून पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांकडून प्रत्येकी हजार रूपये जमा करत कोट्यवधीची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी दहा दिवसात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा फसगत झालेल्या शेतकर्‍यांसह पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांतर्फे देण्यात आला आहे.

अप्पर जिल्हाधिकार्‍यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामा मिस्तरी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी निवेदन देत शेतकर्‍यांकडून कोट्यवधी रूपये जमा करत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पालकमंत्री भुसे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. अवसायानात असलेला गिरणा सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी गिरणा बचाव समितीच्या नावाखाली गिरणा-मोसम शुगर अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. ही कंपनी स्थापन करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रत्येकी हजार रूपये जमा केले होते.

कोट्यवधी रूपये जमा झाले असतांना फक्त कंपनीचे 47 मुख्य भागधारक दाखवून त्यांच्याकडून 16 कोटी 21 लाख 8 हजार 800 रूपयांचे भागभांडवल गोळा केले असल्याचे दाखवले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी गिरणा कारखाना तर वाचवलाच नाही परंतू शेतकरी व मुख्य भागधारकांची कोट्यवधी रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणाची येत्या दहा दिवसाच्या आत सखोल चौकशी होवून दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच शेतकर्‍यांसह कंपनीच्या भागधारकांना त्यांचे पैसे व्याजासह परत मिळवून देण्यात यावे, अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर फसगत झालेल्या शेतकर्‍यांसह जनआंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी महानगरप्रमुख राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, नथू जगताप, प्रविण देसले, भरत पाटील, जितेंद्र देसले, अजय जगताप, का.शा. पवार, सुधीर चव्हाण, पवन ठाकरे, संजय निकम, भरत आखाडे, विठोबा छरंग, नंदकिशोर सोनवणे, रामदास सूर्यवंशी, सनी जगताप, विलास बिरारी आदीं उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com