नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गोदावरीचे जलस्त्रोत पुनर्जिवित होण्यासाठी नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र गाळ काढण्याच्या नावाखाली नदीपात्रातून जोरदार वाळू उपसा सुरु आहे.

गोदेच्या नदी पात्रातील प्रवाहास त्यामुळे धोका निर्माण होण्याची भिती असून वाळू उपसा त्वरीत थांबवा अशी मागणी नमामी गोदा फाऊंडेशनने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

गोदा फाऊंडेशनच्या सदस्यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गोदेचा प्रवाह अवरित व निर्मल रहावा यासाठी न्यायालयाने अनेक सूचना दिल्या आहेत. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आली असून त्यानूसार नदी पात्रा लगत अनेक कामे सुरु आहेत.

ही कामे करताना न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट बसविण्याचे काम सुरु असून त्यासाठी नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

मात्र सबंधित ठेकेदाराकडून गाळ काढण्याच्या नावाखाली मोठया प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. गोदा पात्रातील जैवविविधतेसाठी वाळू उपसा धोकादायक असून त्यास गोदाप्रेमींचा तीव्र विरोध आहे. महसूल विभागाच्या परिपत्रकानूसार पूलाच्या दोन्ही बाजूने सहाशे मीटर अंतरात वाळू उत्खनन करता येत नाही. या ठिकाणी तर थेट नदीपात्रातून वाळू उपसा सुरु आहे.

या कामामुळे गोदावरीबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचना पायदळी तुडवल्या जात आहे. स्मार्ट सिटीच्या कामास आमचा विरोध नाही पण गोदेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य होता कामं नये.

त्यामुळे वाळु उपसा त्वरित थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, उपाध्यक्ष चिन्मय उदगीरकर आदीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.