चौदा महिन्यांपासून लहान क्लासेसची रोजी-रोटी बंद

शासनाने मदत करावी अशी मागणी
चौदा महिन्यांपासून लहान क्लासेसची रोजी-रोटी बंद
शिकवणीचा रिकामा वर्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या चौदा महिन्यांपासून सर्वप्रकारचे क्लासेस बंद असल्याने व यापुढेही नजिकच्या काळात सुरु होण्याची शक्यता नसल्याने, जिल्ह्यातील व पर्यायाने महाराष्ट्रातील​ छोटे व घरगुती क्लासेस संचालक, भयंकर आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा आता कठीण झाला आहे...

या छोट्या व घरगुती क्लासेस संचालकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करणारे पत्र, आज कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवले आहे. लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असेही संघटनेने आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे म्हणाले की, शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना नियमित वेतन चालू आहे, मोठे व मध्यम क्लासेसचालक थोड्या बचतीवर तग धरून आहेत परंतु छोटे व घरगुती क्लासेस संचालकांचा मात्र कणा पार मोडला आहे.

अनेक क्लासचालकांनी जागा सोडल्या आहेत, काहींचे भाडे थकले आहेत, कर्जाचे हप्ते थकले आहेत, घरखर्च व किराणालाही आता पैसे राहीले नाहीत त्यात आजारपणं, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, घरपट्टी, लाईटबीले आदी खर्चांनी हे लोक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

मागील महिन्यात, नाशिकमध्ये एका क्लासचालकाने आत्महत्या केली आहे तर एकाचे तणावामुळे हृदयविकाराने निधन झाले आहे. अनेकजण भाजीपाला विकणे, इतर वस्तू विकणे असे छोटे व्यवसायही करुन पाहत आहे परंतु त्यात लॉकडाऊनमुळे पाहिजे तसे उत्पन्न येत नाही.

ऑनलाईन क्लासेस पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. या कठीण परिस्थितीत शासनाने अशा क्लासेससंचालकांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी. महाराष्ट्र राज्य संघटना व जिल्हासंघटना अशा गरजु व पात्र लोकांची यादी शासनाकडे द्यायला तयार आहे.

शासनाने हातावर पोट असलेल्या अनेक सामाजिक घटकांना नुकतीच मदत जाहीर केली आहे, त्याप्रमाणे निदान रोजी नसेल पण रोटीसाठी तरी आर्थिक मदत त्वरीत द्यावी अशी मागणी संघटनेने या पत्रात केली आहे.

पत्रावर खजिनदार अतुल आचलिया, सरचिटणीस लोकेश पारख, विभागप्रमुख पवन जोशी, महिलाप्रमुख पुनम कांडेकर यांसह उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com