जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 'इतक्या' निधीची मागणी

जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 'इतक्या' निधीची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यातील अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी 77 कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे.

राज्यातील जून ते सप्टेंबर हा पावसाचा मोसम असला तरी अवकाळी पावसाची मार्चपासूनच जिल्ह्यात हजेरी सुरू आहे. एप्रिल महिन्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे 35 हजार 290 हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. दि. 7 ते 16 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील एकूण 1097 गावांना फटका बसला आहे. तब्बल 79 हजार 438 शेतकर्‍यांचे यामुळे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांचे 43 हजार 340.81 हेक्टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाले आहे. या शेतकर्‍यांसाठी 76 कोटी 86 लाख 26 हजार रुपये निधी अपेक्षित असून तो मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. बागायत क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून 64 हजार 978 शेतकर्‍यांना या पावसाचा फटका बसला आहे. 37 हजार 545 हेक्टरवरील बागायती पिकांची या पावसान हानी झाली असून, या शेतकर्‍यांसाठी 63 कोटी 82 लाख 76 हजार रुपये मदत मागण्यात आली आहे.

कांद्याचे सर्वाधिक नुकसान

बागलाण तालुक्यात 157 गावांमधील 30 हजार 970 शेतकर्‍यांच्या 22 हजार 529 हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक 21 हजार 323 हेक्टर क्षेत्र कांद्याचे आहे. नांदगावमध्ये 12 हजार 610 शेतकर्‍यांचे 6 हजार 245 हेक्टर, सुरगाणा येथे 9 हजार 344 शेतकर्‍यांचे 600 हेक्टरवरील कांदा आणि 200 हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी आणि निफाडमध्ये प्रत्येकी 4 हजार 400 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक 35 हजार 290 हेक्टरवरील कांदा, 3 हजार 410 हेक्टर द्राक्षे, 1 हजार 92 हेक्टरवरील डाळिंब आणि 1 हजार 238 हेक्टर आंब्याचे नुकसान झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com