सरकार, कैची बंद पडलीय, काहीतरी पोटापाण्याच बघा..!

सरकार, कैची बंद पडलीय, काहीतरी पोटापाण्याच बघा..!

नाभिक समाजाकडून मदतीची मागणी

नाशिक । Nashik

करोना संसर्गाची सुनामी रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लाॅकडाऊन वाढविण्यात आला असून तिचा सर्वाधिक फटका सलून दुकानदारांना बसला आहे.

मागील दीड महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने जिल्ह्यातील चार ते पाच हजार सलून दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा व फेरीवाल्यांप्रमाणे राज्य शासनाने सलून दुकानदारांना आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

१५ एप्रिलपासून राज्यात १५ दिवसांचा लाॅकडाऊन जारी केला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत.

मात्र,नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अगोदरच मिनी लाॅकडाऊन जारी केला होत‍ा. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून शनिवारी व रविवारी सलूनची दुकाने बंद ठेवण्यास सांगितली होती.

किमान रविवारी दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दयावी, अशी मागणी सलून संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनानेच राज्यात १५ दिवस लाॅकडाऊन घोषित केला. त्यामुळे सलून दुकाने बंद असून उदरनिर्वाह करायचा कसा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

रविवार कटिंग व दाढि करण्यासाठी सर्व दुकाने हाऊसफुल असतात. मात्र तब्बल महिनाभरापासून शटर डाऊन असल्याने सलून दुकानरांची उपासमार होत आहे. दुकानांचे भाडे, कारागिरांचे वेतन व इतर खर्च भागविण्यासाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न दुकानदारांना सतावत आहे. त्यातच पुन्हा १ जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे.

सरकारने फेरिवाले, रिक्षावाले व अन्य घटकांना आर्थिक मदत जारी केली आहे. मात्र, त्यात सलून दुकानदारांचा कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सलून दुकानदारांमध्ये नाराजी असून सरकारने आर्थिक मदतीचा विचार केला जावा, अशी मागणी सलून दुकानदार संघटनेकडून केली जात आहे.

वर्षभरापासून टांगती तलवार

मागील वर्षी लाॅकडाउनमुळे सहा ते सात महिने सलून दुकाने बंद होते. मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सलून दुकाने उघडण्यास उशीरा परवानगी देण्यात आली.

सोशल डिस्टन्स, मास्क घालणे, सॅनिटायझर आदी करोना नियमाचे पालन सलून दुकानदार व्यवसाय करत आहेत. थोडेफार कुठे पूर्वपदावर आले असताना पुन्हा मिनी लाॅकडाऊन व आता लाॅकडाउन जारी झाला. त्यामुळे सलून दुकानदारांसमोर पुन्हा उपासमारीचे संकट उभे ठाकले आहेत.

लाॅकडाऊनमुळे तर सलून दुकाने बंद असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने १ जूनपर्यंत लाॅकडाउन वाढवला आहे. सरकारने सलून दुकानदारांसाठी आर्थिक मदत घोषित करावी.

- राकेश पाटिल, सलून दुकानदार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com