जिल्हा परिषदेत रिक्त पदे भरण्याची मागणी
नाशिक

जिल्हा परिषदेत रिक्त पदे भरण्याची मागणी

आरोग्य विभागातील ९१० पदे रिक्त

Abhay Puntambekar

नाशिक। विजय गिते

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत मागील सहा वर्षापासून रिक्त पदांची भरती झालेले नाही.यामुळे दरवर्षी रिक्त पदांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऐन करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पन्नास टक्केच सेवकांवर संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याचा भार आला आहे.यामध्ये आरोग्य सेवक (महिला) ५३० तर आरोग्य सेवक (पुरुष) यांची तब्बल २५७ पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाने शासनाकडे ही रिक्त पदे भरावीत, यासाठी वारंवार मागणी केलेली आहे. मात्र, ही भरती अद्याप झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी रिक्त पदामध्ये सातत्याने वाढ होतच आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तांत्रिक संवर्गातील वर्ग तीनची २११४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९१० पदेही रिक्त आहेत.

परिणामी सद्यस्थितीतील कोविड साथरोग परिस्थितीत ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड-१९ या साथीच्या आजाराचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. आरोग्य विभागाकडील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवकांना साखळी पद्धतीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

सद्यस्थितीत आरोग्य विभागातील संवर्ग निहाय रिक्त पदे पुढीलप्रमाणे: आरोग्य सेविका (महिला) मंजूर पदे १०६९ असून त्यापैकी ५३० पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक (महिला) मंजूर पदे १२३ असून ६० पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक (पुरुष ) ५६९ पदे मंजूर असून २५७ पदे रिक्त आहेत.आरोग्य सहाय्यक (पुरुष )१४८ पदे मंजूर असून १५ पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारी ११४ पदे मंजूर असून १७ पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञची ७२ पदे मंजूर असून १६ पदे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक १९ पदे मंजूर असून १५ पदे रिक्त आहेत. याप्रमाणे एकूण २११४ पदे मंजूर असून १२०४ पदे भरलेली आहेत तर तब्बल ९१० पदे रिक्त आहेत.

कोविड -१९ काळात ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाकडील रिक्त पदे ही शंभर टक्के भरण्यात यावीत. याबाबत संबंधित विभागास निर्देश द्यावेत. याबाबत आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाला तशा सूचना दिल्या आहेत.

बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष जिल्हा परिषद

Deshdoot
www.deshdoot.com