पीक नुकसान भरपाईची मागणी

चराचे काम सुरू करून रस्ता मोकळा करा
पीक नुकसान भरपाईची मागणी

निफाड । प्रतिनिधी Niphad

देवगाव-कानळद रस्त्यावर (Devgaon-Kanalad road) असलेला नैसर्गिक नाला व शासकीय पाण्याच्या प्रवाहात चर असून काही शेतकर्‍यांकडून सदरचा चर/नाला बंद केल्याने परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतात हे पाणी जाऊन शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपले स्तरावरून याबाबत योग्य ती कार्यवाही होऊन पीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी. तसेच बंद पडलेल्या चराचे काम पुन्हा सुरू करावे अशी मागणी देवगाव परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदार शरद घोरपडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्यात पावसाचे पाणी देवगाव-कानळद परिसराकडे वाहत आहे. परिणामी या परिसरात चर काढून पाणी काढून द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, तहसीलदार शरद घोरपडे यांचेकडे केली होती.

परिणामी अधिकारी, पदाधिकार्‍यांनी या परिसराची पाहणी करून चर करण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. परंतु काही शेतकर्‍यांकडून या चराचे काम बंद पाडण्यात आले आहे. साहजिक काम बंद पडल्याने अनेक शेतकर्‍यांच्या ऊसात पाणी शिरले असून ऊस तोडणीला अडचणी येत आहेत.

साधारणपणे 70 ते 80 वर्षांपासून सदर नैसर्गिक नाले व चर प्रवाहित असून त्याबाबत शासन दरबारी नकाशे आहेत. मात्र आत्ताच अचानक त्याचा प्रवाह या शेतामधून कसा बंद झाला. तसेच शासकीय अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडून याबाबत कार्यवाही करीत नाहीत. अधिकार्‍यांच्या या कृतीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने देवगाव-कानळद हा रस्ता देखील बंद झाला आहे.

साहजिकच या परिसरातील ऊसाची तोडणी देखील करता येत नाही. काही शेतकर्‍यांच्या आडमुठे धोरणामुळे मका, सोयाबीन, गहू, हरभरा, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देवगाव-कानळद या रस्त्यावर पुलाचे काम देखील थांबले आहे. साहजिकच शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. तसेच पिकामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या बंद पडलेल्या चराचे काम पूर्ववत सुरू करण्याबरोबरच पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने या पीक नुकसानीची भरपाई द्यावी. तसेच पुलाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी तहसीलदार शरद घोरपडे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर राजेंद्र रंगनाथ बोचरे, विजय रंगनाथ बोचरे, संतोष जगन्नाथ बोचरे, गणेश चांगदेव बोचरे, गोपीनाथ पांडूरंग बोचरे, साहेबराव सोनवणे, सुशीला सोनवणे, सुलभा सुनील सातपुते, गणेश लक्ष्मण सातपुते, सोमनाथ रमेश कोरडे, मोहन लक्ष्मण पिंपळे, रामकृष्ण पिंपळे, भीमराज विठ्ठल चौधरी, अरूण शिवराम निलख, माधव शिवराम निलख, संजय पंढरीनाथ निलख, हरिश्चंद्र काशिनाथ बोचरे, जनार्दन कारभारी बोचरे, दत्तात्रय कारभारी बोचरे, कृष्णा बोचरे, रामनाथ नामदेव बोचरे आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com