उड्डाणपूल उभारण्याची मागणी

उड्डाणपूल उभारण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आडगाव ट्रक टर्मिनलसमोर ( Adgaon Truck Terminal ) मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ओव्हर ब्रिज ( Fly Over ) बांधण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Nashik District Transport Association ) वतीने करण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव येथे आडगाव ट्रक टर्मिनल विकसित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच मुंबई-आग्रा हायवेवर वाहतूक अधिक असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्व देखील आले असल्याचे म्हटले आहे.

तसेच, आडगाव ट्रक टर्मिनल समोर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ओव्हर ब्रिज विकसित यावी, अशी सर्व वाहतूकदारांची मागणी आहे. या ठिकाणी ओव्हरब्रिज विकसित झाल्यास येथील वाहतुकीचा प्रश्न मागे लागून अपघातांचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पदग्रहण सोहळा

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पदग्रहण सोहळा रविवारी (दि.15) सायंकाळी 6 वाजता स्वामीनारायण बँक्वेट हॉल, आडगाव नाका नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकान्वये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी माहिती दिली.

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिरेक्टरी अनावरण व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मोबाईल अ‍ॅपचे लॉन्चिंग करण्यात येणार आहे.

या सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, सरोज आहिरे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, अनिल कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटी चेअरमन मलकितसिंग बल, महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश गवळी, महेंद्र आर्या, जनरल सेक्रेटरी संगरप्पा, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.