दिंडोरी : कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्याची मागणी

दिंडोरी : कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्याची मागणी

दिंडोरी । Dindori

दिंडोरी शहरात आणि तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या नातलगासाठी अन प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून कुठेही रुग्णाला जागा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दिंडोरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दिंडोरी शहरात तत्काळ एका कोविड रुग्णालयाची शासनाने निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

सध्या ग्रामीण भागात करोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे खेडोपाडी सर्वत्र करोनाचे रुग्ण दिसून येत आहे. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात दवाखान्यात येत असल्याने डॉक्टरांची सुध्दा डोकेदुखी वाढली आहे. शहरातील कोविड रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नसल्याने सर्वत्र पळापळ सुरु असल्याचे चित्र आहे. दिंडोरीतून नाशिकला रुग्ण पाठवावे लागत आहे.

तर नाशिकला सुद्धा रुग्णाला दाखल करुन घेत नसल्याने नागरिकांना कुणाचाही आधार मिळणे अवघड झाले आहे. अनेक वेळा रेमडेसिव्हर हे इंजेक्शन मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. दिंडोरी शहरात फक्त घोषणांचा पाऊस झाला. परंतू ऑक्सीजन बेड संख्या वाढत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.

दिंडोरीत एकाही डॉक्टरकडे ऑक्सीजन बेड शिल्‍लक नाही. या पार्श्‍वभुमीवर कोविड रुग्णालयाची तत्काळ निर्मिती करावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतिश देशमुख, सचिन देशमुख, अ‍ॅड. गणेश बोरस्ते, संतोष मुरकूटे, बापू जाधव, सुजित मूरकुटे, गुलाब गांगोडे, संदीप जाधव आदींनी केली आहे.

नगरपंचायत प्रशासनाने व्यापारी बांधवांसाठी रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्ट सुरु केली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन. परंतू असे असले तरी व्यापारी बांधवांना दि. 10 एप्रिल पयर्ंंत टेस्ट करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. तरी नगरपंचायत प्रशासनाकडून सर्व प्रथम व्यापारी बांधवांचीच टेस्ट करण्यात यावी. कारण त्यामुळे करोना फैलाव होण्यास प्रतिबंध होणार आहे व व्यापारी बांधवांचे व्यवसाय सुरळीत चालू राहील.

सचिन देशमुख, माजी नगराध्यक्ष, दिंडोरी नगरपंचायत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com