ओझर। Ozar (वार्ताहर)

येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या गडाख कॉर्नर समोरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सायखेडा फाटा उड्डाण पुलावरील वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे.

यामुळे सर्व्हिस रोडवरील बाणगंगा नदी पुलापासून पुढे पिंपळगाव बाजूकडे जाणार्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होत आहे.

गडाख कॉर्नर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे व दोन्ही उड्डाणपूल एकमेकांना जोडण्याचे काम लवकर पूर्ण करून दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सायखेडा फाटा उड्डाणपुलावरील नाशिकहून पिंपळगावकडे जाणारी एकच बाजू सुरू असून पुलावरून वाहने खाली आल्यानंतर वाहतूक बाणगंगा नदी पुलाच्या जवळ सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे दहाव्या मैलापासून ओझरकडे सर्व्हिस रोडने येणारे वाहने व उड्डाणपुलावरून सर्व्हिसरोडला वळवलेली वाहतूक यामुळे या सर्व्हिस रोडवर वाहतूककोंडी होते.

ती सुरळीत होण्यासाठी गडाख कॉर्नर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करून सायखेडा फाटा व गडाख कॉर्नर उड्डाणपूल एकमेकांना जोडण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

त्याचप्रमाणे खंडेराव मंदिरासमोरील सर्व्हिस रोड खड्डेमय झाल्याने या रोडची दुरवस्था झाली आहे. या सर्व्हिस रोडचे नव्याने डांबरीकरण करावे. तसेच समता नगर समोरील सर्व्हिस रोडचे राहिलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, ओझर टाऊनशिप ते दहावा मैल या सर्व्हिस रोडवर बाणगंगा नदीवरील छोट्या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे महामार्गावरील पिंपळगाव बाजूकडून येणार्या वाहनांसाठी हा रस्ता खुला झाला आहे.