आगीत लाखोंची हानी; नुकसान भरपाईची मागणी
इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यातील शेणवड बुद्रुक (Shenwad Budruk) येथे ८ एप्रिलला गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाल्याने घराला मोठी आग लागली होती. या आगीच्या घटनेत अंदाजे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले होते. आग लागली तेव्हा येथील रहिवासी परगावी गेलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, या घटनेनंतर शासनाने या कुटुंबाला कोणतीही नुकसान भरपाई (Damages) न दिल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, शेणवड बुद्रुक येथील रहिवासी काशिनाथ त्र्यंबक कोकाटे यांच्या घराला आग (Fire) लागली होती. त्यावेळी या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पंरतु, लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आगीचा पंचनामा (Panchnama) करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच कैलास कडू यांनी केली होती.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कोकाटे कुटुंब रस्त्यावर आले आहे. तसेच आगीची घटना घडल्यावर प्रशासनाने पंचनामा देखील केला होता. मात्र, दीड महिना उलटून गेला तरी या कुटुंबाला अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने (Government) त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोकाटे कुटुंबाने केली आहे.