
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
तालुक्यातील वळवाडे ( Valvade ) ते हाताने ( Hatane) परिसरातील गावांना मोसम नदीच्या( Mosam River ) पूरपाण्याचा ( Flood Water )लाभ होण्यासाठी नवीन कालव्याची निर्मिती करून वर्षानुवर्ष पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या शेतकरी व ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे ( Dr. Subhash Bhamre ) यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यासंदर्भात बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, अध्यक्ष कमलाकर पवार व मनपा गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा.डॉ. भामरे यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वळवाडे ते हाताने परिसरातील गावांच्या क्षेत्रास मोसम नदीच्या पूरपाण्याचा लाभ होण्यासाठी नवीन कालव्याचे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ अनेक वर्षापासून करीत आहेत. त्या अनुषंगाने मार्च 2000 ते जून 2006 या कालावधीत मालेगाव पाटबंधारे विभागांतर्गत मोसमसाळ कालवा शाखेकडून प्रस्तावित नवीन कालव्याचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते.
प्रस्तावित कालवा मौजे वळवाडे गावाजवळील सध्याच्या आउटलेट (मोसम नदीवरील बंधारा गेट) पासून सुरु होतो. गारेगाव, खाकुर्डी, मोरदर, टिपे, कंक्राळे, कुकाणे, करंजगव्हाण व शेवटी हाताने शिवारातील देवी मंदिराजवळील नाल्यापर्यंत कालव्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदर कालवा साधारणत: 1.5 मीटर खोदाई व 1.5 ते 2 मीटर भरावातून केला जाईल. कालव्याची लांबी अंदाजे 30 कि.मी. इतकी असून सन 2006 च्या पाटबंधारे विभागाच्या दरसूची नुसार 4.87 कोटी रुपये रक्कमेचे अंदाजपत्रक देखील तयार करण्यात आले होते. तथापि मोसम नदीवरील हरणबारी धरणाच्या जल नियोजनात पाणी शिल्लक नसल्यामुळे हा विषय मार्गी लागू शकला नसल्याचे सांगण्यात येते.
मालेगाव शहरालगतच्या मौजे द्याने, वडगाव, मालेगाव (पवारवाडी), दरेगाव, म्हाळदे या मोसमसाळ कालव्याच्या लाभक्षेत्रात नागरीकरण झाल्यामुळे आपोआपच सदर क्षेत्रासाठीचे पाणी वापर अनेक वर्षापासून बंद झालेले आहे. त्यामुळे सदर लाभक्षेत्राचे मंजूर पाणी नवीन प्रस्तावित कालव्यासाठी वापरता येईल व वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या उपरोक्त गावांच्या लाभक्षेत्रास मोसम नदीच्या पूरपाण्याचा लाभ होऊ शकेल. यास्तव नवीन प्रस्तावित कालव्याचे सविस्तर सर्वेक्षण करून कालव्याच्या कामास मंजुरी मिळावी व काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, मनपा गटनेते सुनील गायकवाड, बारा बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष कमलाकर पवार, भाजपचे बागलाण तालुकाध्यक्ष संजय देवरे, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, समाधान ठोंबरे आदिंनी खा.डॉ. भामरे यांच्याकडे केली आहे.