निफाड। प्रतिनिधी Niphad

येथील पं.स. आवारातील हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीचे व सुशोभिकरणाचे काम व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पं.स. चे सहाय्यक गटशिक्षणाधिकारी रविकांंत सानप यांना निवेदन देण्यात आले.

प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पं.स. आवारातील हुतात्मा स्मारकाभोवती डुकरे आणि कुत्र्यांचे वास्तव्य दिसून येत आहे.

या देशासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवुन स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले व ब्रिटिश सरकार विरोधात लढा उभा करुन प्रसंगी तुरुंगवास भोगला. अशा आपल्या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारक स्तंभाची अवहेलना शासनाने लक्षात घ्यावी. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा मान सन्मान जपण्यात यावा यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आल्याचे प्रहार जनपक्षाच्या वतीने सागर निकाळे यांनी म्हटले आहे.

तसेच हुतात्मा स्मारकाचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी स्मारकाची उंची वाढवून सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. 1942 च्या लढ्यात व स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणून शासनाने सदरचे स्मारक उभारलेले आहे. ज्यांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याची सर्व अनुभूती उपभोगतो आहोत त्यांच्या स्मारकाची अशी हेळसांड व दुरावस्था होणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. याबाबत आपण शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून त्याचे नूतनीकरण व सुशोभिकरण लवकरात लवकर करावे अन्यथा त्याबाबत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, तालुकाध्यक्ष दिगंबर वडघुले, तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, राज्य समन्वयक संध्या जाधव, दिव्यांग उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष अशोक चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अण्णासाहेब रायते, तालुका सहसंघटक ज्ञानेश्वर सांगळे, सचिव अरूण थोरे, संपर्क प्रमुख संदीप भुजबळ, विकास निकाळे, सरचिटणीस भाऊसाहेब जमधाडे, प्रमोद चव्हाण, सिद्धार्थ खडताळे, संकेत निकाळे, विलास भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.