पिंपळगाव ब.। वार्ताहर

पिंपळगाव बसवंत येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली व व उंबरखेड चौफुलीवरील उड्डाणपुलावरून शहर व परिसरात वाहनधारकांना चढ-उतार करता येण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करावा, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

चिंचखेड चौफुलीवरील उड्डाणपूल बहुप्रतीक्षेनंतर दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र उड्डाणपुलावरून शहर व परिसरातील नागरिकांना चढ-उतार किंवा सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवलेला नाही. त्यामुळे पिंपळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी 6 कि. मी. उड्डाणपुलाच्या अंतरात ब्रेक नाही. वाहनधारकांची झालेली गैरसोय लक्षात घेत खासदार डॉ. भारती पवार व आमदार दिलीप बनकर यांनी स्वतंत्रपणे उड्डाणपुलाला भेट देत नागरिकांची अडचण समजून घेतली होती.

त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांना उड्डाणपुलावर पाचारण करत तातडीने प्रमिला लॉन्स व शगून लॉन्ससमोर दोन्ही बाजूने उड्डाणपुलावरून चढ-उतार करण्यासाठी प्रशस्त मार्ग निर्माण करण्याचे आदेश दिले होते. अधिकार्यांनी देखील आठ ते पंधरा दिवसांत पर्यायी मार्ग करण्याची ग्वाही दिली होती.

मात्र दोन महिने उलटूनही या ठिकाणी नागरिक व वाहनधारकांच्या हिताची सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींंच्या आदेशालाही प्राधिकरणने वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. पर्यायाने वणीकडून येणार्या शेतमालाच्या वाहनांसह इतर वाहनांची सर्व्हिस रोडवर कोंडी होण्याचे प्रकार सुरू झाले आहे. महामार्गावर पर्यायी मार्ग निर्माण केल्यास नाशिकहून पिंपळगाव शहरात येणारी वाहने या ठिकाणी उतरू शकतील. तर महामार्गावर जाणार्या वाहनांना महामार्गावर जाता येऊ शकेल, असेही वाहनचालकांनी म्हटले आहे.

चौफुलीवरील पथदीप बंद

पिंपळगाव बसवंत टोल प्रशासनाचे चिंचखेड, उंबरखेडसह अनेक ठिकाणी लावण्यात आलेले पथदीप गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळेस महामार्गावरील भुयारी मार्गावर अंधाराचे साम्राज्य तयार होते. परिणामी पादचार्यांना हा रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. दोन महिन्यांपासून हे पथदीप बंद असतानाही टोल प्रशासनाने मात्र अद्याप त्याकडे लक्ष न दिल्याने आणखी किती काळ हे पथदीप बंद राहणार, असा प्रश्न आता नागरिक व पादचारी उपस्थित करत आहेत.