जिल्हा परिषद सेवकांचे वेतन रखडले

जिल्हा परिषद सेवकांचे वेतन रखडले

नाशिक । प्रतिनिधी

करोना महामारीच्या संकटात जिल्हा परिषदेचे सेवक जीव धोक्यात घालून काम करीत असताना महिन्याचे वेतन मिळत नसल्याने सेवकांचे हाल होत आहेत. महिन्याची 15 तारीख उलटून गेली. तरी देखील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील सेवकांचे वेतन झालेले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विभागातील वेतन सांभाळणार्‍या सेवकांमुळेच वेतन वेळेत होत नसल्याचा आरोप विभागातील सेवकांकडून होत आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयातील अर्थ विभागाचे वेतन नियमितपणे 1 तारखेला होते. याशिवाय शिक्षण विभागातील शिक्षकांचे वेतनही वेळेवर होत आहे; मात्र सामान्य प्रशासन व आरोग्य विभागाचे वेतन वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. साधारणत: 1 ते 7 तारखेच्या दरम्यान, सेवकांचे वेतन होणे अपेक्षित आहे; परंतु दर महिन्याला सामान्य प्रशासन विभागाचे वेतन रखडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून 12 ते 17 तारखेदरम्यानच वेतन होत असल्याचे सांगितले जात आहे.

करोनाच्या संकटात अनेक सेवकांच्या कुटुंबांत करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.़ कुटुंबातील काही सदस्यांना इतर गंभीर स्वरूपाचेही आजार आहेत. काही सेवकांचे गृहकर्जाचे हप्ते आहेत. वेतन वेळेत होत नसल्याचा फटका त्यांना बसत आहे. आजारपणासाठी पैसे नसल्याने सेवक वर्गाला हात उसने पैसे घेऊन, करोनावर मात करण्याची वेळ आली आहे. विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळेत वेतन करावे, अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com