पोस्टातून आठ दिवसानंतरही टपाल मिळेना

पोस्टातून आठ दिवसानंतरही टपाल मिळेना

सिन्नर । प्रतिनिधी

टेलीफोन, इंटरनेट यासारख्या अत्याधुनिक सुविधा आल्या तरी पोस्टाची गरज कमी झालेली नाही.

आजही अनेक नोकरीसाठीचे अर्ज पोस्टाच्या माध्यमातूनच पाठवले जातात. नोकरीचा कॉलही पोस्टानेच येतो. टपाल एक दिवस उशिरा आले तर आयुष्यातली संधी गमावण्याची वेळ अनेकांवर येते. असे असतांना गेल्या काही दिवसांपासून करोना संकटाचे नाव पूढे करत आठ-आठ दिवस टपालांचा बटवडाच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अनेक व्यावसायिक आजही पोस्ट सेवेवर भरवसा ठेवत आपली महत्वाची कागदपत्र पोस्टाद्वारेच पाठवत असतात.बँकाचे चेकबूकही सर्वच बँका नेहमीच पोस्टानेच येतात. शासनाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही पोस्टानेच येतात. मात्र, करोना सकटाचे नाव पुढे करीत पोस्टाकडून गेल्या काही दिवसांपासून टपालांचा बटवडाच उशिरा होऊ लागला आहे. नाशिकहून टपाल घेऊन गाडीच आली नाही, टपाल कमी असल्याने नाशिकहून गाडी दररोज येत नाही यासारखी धक्कादायक कारणे सध्या पोस्टात जाणार्‍या ग्राहकांना ऐकायला मिळत आहेत.

सध्या सिन्नर-नाशिक बसेस सुरु झाल्या आहेत. पूर्वी नाशिकहून येणारे सर्वच टपाल एस.टी. बसनेच येत असे. असे असतांना टपाल खात्याला खास सिन्नरसाठी स्वत:चे वाहन पाठवण्याची गरज का पडावी असा प्रश्न ग्राहकांना पडतो आहे. ग्राहकांनी टपाल वेळेवर पोहचावे यासाठी टपाल तिकीटाच्या माध्यमातून खर्चही पोस्टाला आधीच भरलेला असतांना टपाल येण्याची वाट पाहण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे.

नाशिक, पूण्याहूनही पत्र यायला आठ-दहा दिवस लागत आहेत. चौकशीसाठी गेल्यास पोस्टातील अधिकारी, सेवकांकडून समाधानकारक उत्तरही मिळत नाही. बँकाचे चेकबूक संपण्यापूर्वीच ग्राहक बँकेत अर्ज करत असतात. पाच-सहा दिवसात चेक बूक पोस्टाने घरी येईल असे बँक सांगते. मात्र, दहा-दहा दिवसांनंतरही चेकबूक येत नसल्याने अनेक व्यावसाईक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम व्यावसाईकांच्या दैंनदिन कामकाजावर होऊ लागला आहे. पोस्टाने गाडीचा बहाणा न करता ‘स्पीड पोस्ट’ या आपल्या उपक्रमाप्रमाणे आपल्या दैंनदिन सेवेलाही स्पीड पकडावे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com