नवीन नाशिक । वार्ताहर New Nashik

नाशिकच्या प्रवेशद्वाराजवळ हिरव्यागार वृक्षांनी नटलेल्या पांडवलेणीच्या पायथ्याशी वृक्षांची बेसुमार तोड होत असल्याचे दिसून आले. वृक्ष तोड करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे रवींद्र गामणे यांनी केली आहे.

वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने काही नागरिक या ठिकाणी घुसून वृक्षतोड करत असल्याचे बोलले जात आहे. पांडवलेण्याच्या डोंगर निसर्गसौंदर्याने नटलेला असून याठिकाणी पर्यावरणप्रेमी व निसर्गाच्या सानिध्याशी निगडीत असलेले अनेकजण शुद्ध हवेसाठी फिरावयास येतात. परंतु पांडवलेणीच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेल्या वृक्षांची बेसुमार तोड होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या निसर्गप्रेमींनी वृक्ष तोडणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक या बाबीशी निगडित असलेल्या वृक्षप्रेमींनी अनेक प्रकारचे वृक्ष लावलेले आहेत. त्यांचे संगोपनही केले जाते. पांडवलेणी येथे असलेले सेवक संध्याकाळी निघून जातात तर दुपारी व संध्याकाळच्या वेळेला वनविभागाकडूनही कोणाचे लक्ष नसल्याने वृक्षतोड केली जात आहे.

नाशिककरांच्या दृष्टिकोनातून पांडवलेणी, फाळके स्मारक, बौद्ध स्तूप, बोटॅनिकल गार्डन असा मोठा ठेवा आहे. याठिकाणी सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल छुप्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

रवींद्र गामणे- शिवसेना