सिन्नर रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण

सिन्नर रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण

सिन्नर । वार्ताहर

करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमेडीसिविर, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे करोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राणाला मुकावे लागत आहे.

मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नाशिक लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी स्वयंमनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारण्यात आल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निश्चितच दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा करोनामुक्त होण्यासाठी खा. गोडसे यांनी केलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी येथे केले.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात ) खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांतून स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण करण्यात आले. या युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी आमदार राजाभाऊ वाजे बोलत होते. व्यासपिठावर जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, प्रांताधिकारी पुजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, शैलेश नाईक, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, नामदेव शिंदे, बांधकाम व्यावसायिक अभय चोक्शी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी. टी. कडलग उपस्थित होते.

खासदार गोडसे यांनी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटर यांच्या सहकार्याने आजवर कोरोना बाधितांवरील उपचाराला गती मिळावी यासाठी अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. याशिवाय विविध कंपनींच्या सी. एस.आर. फंडातून आणि बिल्डर्स असोशिएशनच्या मदतीने खा. गोडसे यांनी नाशिक, इगतपुरी, सिन्नर, देवळाली आदी ठिकाणी स्वयंमनिर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करुन ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता करुन दिली आहे. तसेच खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून रेमेडीसिवीर इंजेक्शनचा देखील पुरेसा साठाही त्यांनी रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिल्याचे राजाभाऊ म्हणाले.

सदर युनिट बडोदा येथील अ‍ॅरो या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रतितास 10 एन. एम.क्यू. म्हणजे 160 लिटर ऑक्सिजन इतकी आहे. या युनिटमुळे सुमारे 45 ते 50 रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असून दिवसभरात सुमारे 40 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणे शक्य आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय आता दूर होणार असल्याचे खा. गोडसे म्हणाले. ऑक्सिजन प्लॅन्टसाठी लागणारे जनरेटर उपलब्ध करुन देणार असल्याचे अभय चोक्सी यांनी सांगितले. शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, नामदेव शिंदे, शहर प्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार आदी उपस्थित होते.

खासदार पोहचले करोना बाधितांच्या वार्डात

लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळेआधीच खासदार गोडसे सिन्नर रुग्णालयात दाखल झाले. कोरोना बाधितांचा वार्ड कुठे आहे. याची अधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा करीत ते थेट कोरोना बाधित रुग्णांच्या वार्डात पोहचले. तिथे जावून त्यांनी वार्डाच्या स्वच्छतेची आणि ऑक्सिजनच्या होत असलेल्या पुरवठ्याची माहिती रुग्णांकडून जाणून घेतली. खासदार थेट आपल्याशी संवाद साधत असल्याने कोरोना बाधित रुग्णांना हायसे वाटले. यावेळी खा. गोडसे यांनी वार्डातील रुग्णांची आस्तेवाईक चौकशी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com