येवला । प्रतिनिधी

शिक्षणाचा नवा अध्याय 'रोज फाऊंडेशन' आणि 'प्रवाह संस्थे'च्या राज्यव्यापी शिक्षण दिंडीचा लोकार्पण सोहळा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे झाला. कोविड-19 महामारीच्या काळात हा उपक्रम समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका अदा करेल, असा विश्वास यावेळी भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केला.

एज्युकेशन इनिशिएटिव्ह आणि रोज फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार्या या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गामध्ये शिकणार्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना माईंड स्पार्क हे वेब अॅप्लिकेशनचा वापर शिक्षणासाठी मोफत करता येणार आहे.

डिजिटल शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि एकही विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी रोज फाऊंडेशन आणि प्रवाह संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे रोज फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक राजेंद्र जाधव यावेळी म्हणाले. कोविडच्या संकटकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकवर्ग प्रयत्न करत आहेत. तरीदेखील अनेक विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेणे शक्य होत नाही म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे रोज फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया दुर्धवळे यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एज्युकेशन इनिशिएटिव्हचे काझी झा, स्नेहा गेडाम हे प्रयत्नरशील आहेत. शिक्षण दिंडी उद्घाटन समारंभाचे नियोजन प्रवाह संस्थेचे अध्यक्ष शंकर मांजरे, सचिव संजय गांगुर्डे, खजिनदार नितेश जंगम यांनी केले होते. यावेळी रोज फाऊंडेशनच्या संचालिका रक्षा झाल्टे, बाळासाहेब लोखंडे, संजीवनी संस्थेचे सुभाष गांगुर्डे, बंडू तात्या शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, संतोष राऊळ, सुमित थोरात आदी उपस्थित होते. शंकर ऊर्फ गोटू मांजरे यांनी आभार मानले.