नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांवर विविध प्रकारचे निर्बंध घातले होते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणार्यांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. तथापि रेल्वेसाठी करोना इष्टापत्ती ठरला आहे.

रेल्वेने नेहमी फुकट प्रवास करणार्या आणि ती सवय अंगी बाणवलेल्या प्रवाशांना चांगलाच डोस मिळाला आहे. करोनाबाबतच्या प्रतिबंधक उपायांमुळे फुकट्या प्रवाशांवर आपोआपच अंकुश आला आहे. त्यांच्या संख्येने अभूतपूर्व घट झाली आहे.

22 मार्च 2020 पासून करोना महामारीमुळे अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या, स्थानिक तसेच मेल गाड्यांचाही समावेश होता. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल झाले होते.

परिणामी या कालावधीत अनेक प्रवाशांनी पायी प्रवास करून आपापले घर गाठले होते. कालांतराने 1 मेपासून रेल्वे प्रशासनाने पहिली रेल्वेगाडी सुरू केली. नंतर टप्प्याटप्प्याने विविध प्रकारच्या रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या. त्यात राज्याअंतर्गत तसेच राज्याबाहेर जाणार्या अनेक रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.

रेल्वेगाडीतून प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक नियम लागू केले होते. त्यात तिकीट कन्फर्म असेल अशाच प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा होती. तिकिटासाठी प्रतीक्षा यादीवर असलेल्या प्रवाशांनासुद्धा प्रवासासाठी बंदी होती आणि आजही आहे. कन्फर्म तिकीट होते अशाच प्रवाशांना रेल्वे प्लेटफार्मपर्यंत जाण्याची परवानगी आहे.

ज्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट नव्हते अशा प्रवाशांना रेल्वे फलाटावरसुद्धा जाण्यास परवानगी नव्हती. प्रवाशांना वैद्यकीय तपासणीचे अनेक नियम लागू होते. या सर्व नियम-निर्बंधांमुळे फुकट्या प्रवाशांच्या मनमानीला करकचून ब्रेक लागला आहे. गर्दी नियंत्रणात ठेवता आल्याने रेल्वे प्रशासनाला त्याचा फायदा झाला.

नजर चुकवून फुकट्यांचा प्रवास

करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राजकीय पक्षांचे मोर्चे, अधिवेशने, मेळावे आदी गोष्टींना वाव नव्हता. एरव्ही मोर्च, अधिवेशनानिमित्त रेल्वेने फुकटात प्रवास करणार्या प्रवाशांची गर्दी होत असे. मात्र संसर्ग टाळण्याचे निर्बंध आणि नियमांमुळे अशा प्रकारच्या घाऊक प्रमाणातील फुकट्या प्रवाशांची गर्दीही टाळता आली. सर्व तर्हेच्या उपाययोजना करूनसुद्धा काही फुकटे प्रवासी रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून फुकट प्रवास करण्यात यशस्वी ठरत आहेत.