कांदा निर्यात घटल्याने परकीय चलन घटले

कांदा निर्यात घटल्याने परकीय चलन घटले

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ०९.९५ लाख मेट्रीक टन कांदा निर्यात होऊन देशाला १९५३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीत ५५ टक्के घट झाली असून देशाचे १५१४ कोटींचा परकीय चलनाचा फटका बसला आहे.

२०१९ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने २९ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्यावरील निर्यातबंदी आणली होती. याचा फटका कांदा निर्यातीला बसला असून देशात आर्थिक वर्ष २०१८-१९ खरीप, लेट खरीप आणि रब्बी असे मिळून २२८. १९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते त्यात यंदा १० टक्के वाढ झाली असून २०१९-२० खरीप, लेट खरीप आणि रब्बी २५१.४६ लाख टन कांदा उत्पादन झाले आहे.

मागील वर्षी कांदा भावाने नवनवीन उच्चांक गाठत हाहाकार उडविल्यानंतर केंद्र शासनाने कांदा दर स्थिर करण्यासाठी निर्यातबंदी व्यापार्‍यांच्या साठवणूकीवर मर्यादा असे अनेक उपाय करत बाजारभाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. तब्बल पाच महिने कांदा निर्यातबंदी राहिल्याने देशातून होणारी कांदा निर्यात ठप्प झाली होती. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा मुबलक पुरवठा झाल्याने कांद्याचे भाव कोसळण्यास सुरुवात झाली.

अखेर केंद्राने कांदा भावातील घसरण थांबवण्यासाठी १५ मार्च २०२० पासून निर्यातबंदी उठविली. मात्र या सर्वांचा परिणाम देशातील कांदा निर्यातीला बसला आहे. यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. मात्र देशात संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद असल्याने कांद्याचा मोठा खप कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याकरिता केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज आहे.

सध्या मिळत असणार्‍या दरांमधून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक संकट उभे आहे. सध्या पेरणीसाठी पैसे लागत असल्याने आहे त्या भावात कांदा विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

रामभाऊ भोसले, (शेतकरी)

कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन द्यावे

भारतीय कांद्याचा दर्जा उत्तम असून त्यास मागणी देखील जास्त आहे. मात्र कांदा निर्यातीला अडचणी येत आहे. जगभरातील आयातदारांना सातत्यपूर्ण स्थिर पुरवठा करणे आवश्यक असते. भारतीय कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होतात.कांद्याच्या निर्यातीसाठी निश्चित स्वरूपाचे वार्षिक धोरण असावे.तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेच आहे.

सचिन शिंदे, कांदा निर्यातदार (लासलगाव)

निर्यात आकडे परकीय चलन

२००९-१० : १८.७३ लाख टन (२८३४ कोटी)

२०१०-११ : १३.४० लाख टन (२१५९ कोटी)

२०११-१२ : १५.५२ लाख टन (२१४१ कोटी)

२०१२-१३ : १८.२२ लाख टन (२२९४ कोटी)

२०१३-१४ : १३.५० लाख टन (२८७७ कोटी)

२०१४-१५ : १०.८६ लाख टन (२०१० कोटी)

२०१५-१६ : ११.१४ लाख टन (२५२८ कोटी)

२०१६-१७ : ३४.९२ लाख टन (४६५१ कोटी)

२०१७-१८ : ३०.८८ लाख टन (३०८८ कोटी)

२०१८-१९ : २१.८३ लाख टन (३४६८ कोटी)

२०१९-२० : ०९.९५ लाख टन (१९५३ कोटी)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com