एसटीचे उत्पन्न घटले; सर्वच आगारांना फटका

एसटीचे उत्पन्न घटले; सर्वच आगारांना फटका

नाशिक । प्रतिनिधी

करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शनिवार आणि रविवारी कडक निर्बंध लागू केले होते. या कडक निर्बंधांचा एसटीची प्रवासी वाहतूक, फेर्‍यांसह उत्पन्नावर परिणाम झाला.

या बंदमुळे बाजारपेठा बंद होत्या. शिवाय नागरिकदेखील घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडले होते. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला.

एसटी महामंडळावरदेखील प्रवासी संख्येचा परिणाम जाणवत आहे.नाशिक आगार-1 साठी एकूण 161 बसेस आहेत. शनिवार आणि रविवारी मात्र 70 बस धावल्या. तसेच 80 फेर्‍या झाल्या.

तर, नाशिक आगारातून पुणे, बोरीवली, औरंगाबाद, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात बसेस धावतात. गेल्या जानेवारीपासून महामंडळाच्या बसेस रुळावर येत असतांनाच जानेवारीपासून पुन्हा करोनाचे संक्रमण वाढल्याने नाशिक आगारातून धावणार्‍या बसेसची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. दररोज 50 ते 55 हजार किलोमीटर धावणार्‍या बसेस अवघ्या 20 हजार किलोमीटरपर्यंत येऊन थांबल्या आहेत. रविवारी केवळ 10 ते 12 हजार किलोमीटरच बसेस धावल्या.

सर्वच आगारांना फटका

नाशिक विभागात नाशिक-1,मालेगाव, सटाणा, सिन्नर, मनमाड, कळवण, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, पेठ, पिंपळगाव, येवला, नाशिक-2 असे डेपो असून, या सर्वच डेपोंमधील दैनंदिन उत्पन्नात घट झालेली आहे. नियमित गाड्या बंद करण्याची वेळ आल्याने कर्मचार्‍यांनादेखील काम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com