पाळे खुर्द परिसरात यंदा कांदा उत्पादनात घट
Onion

पाळे खुर्द परिसरात यंदा कांदा उत्पादनात घट

शेतकर्‍यांमध्ये नाराजी

पुनदखोरे । वार्ताहर

सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणजे कांदा पीक; परंतु हवामानातील बदल म्हणा की बेमोसमी पावसाचा परिणाम यावर्षी कांदा पिकावर प्रकर्षाने जाणवला. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी 80 ते 90 क्विंटल झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.

सरासरी एकरी 180 ते 190 क्विंटल कांद्याचे मिळणारे उत्पादन यंदा अर्ध्यावर आल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडणार आहे. मिळालेल्या उत्पादनातून पिकासाठी केलेला खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकर्‍यांचे पूर्ण जीवन उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती शेतकरीवर्गास आहे. त्यातही करोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने भाजीपाला पिके करावी की नाही या संभ्रमात शेतकरीवर्ग आहे.

भाजीपाला पिके करण्यासाठी प्रथम रोपवाटिकेमध्ये पिकांची रोपे नोंदवावी लागतात. त्यानंतर रोपे मिळतात. ही बाब खर्चिक असून त्यानंतर रोपे लागवड करून पिके घेतली जातात. पुढील खर्च हा एकरी लाखात आहे. एवढे करूनसुद्धा भीती आहे ती म्हणजे लॉकडाऊन झाल्याची. आपला शेतमाल कुठे विकावा? असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे.

पाळे खुर्द परिसरात कांदा पिकानंतर टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, वाल पापडी, गवार आदी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु करोना संसर्गाचा प्रादुर्भाव, कोविड-19 नियमांचे पालन यामुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होते की काय अशी भीती शेतकरीवर्गामध्ये चर्चिली जात आहे.

कांदा हे नगदी पीक आहे. या पिकामुळे शेतकरी नेहमी आनंदी राहत असे; परंतु यंदा उत्पादन कमी झाल्याने शेतकरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला आहे. येणार्‍या काळाचा कसा सामना करावा हा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला आहे?

एकनाथ पाटील, शेतकरी, पाळे खुर्द

करोना संसर्गामुळे यंदा शेतकर्‍यांची भयंकर परिस्थिती झाली आहे. कारण नगदी पीक कांदा उत्पादन घटल्याने शेतकरी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे. पाणी असून शेतीत पिके घ्यावी की नाही हा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. लॉकडाऊन असेच चालू राहिले तर शेतमाल विकायचा कुठे? असा प्रश्न पडला आहे .

सचिन पाटील, जयदीप पाटील, शेतकरी, पाळे खुर्द

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com