कांदा उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण
कांदा उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

कळवण । प्रतिनिधी

करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील तसेच कळवण तालुक्यातील रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणजे कांदा पीक परंतु हवामानाचा बदलाव म्हणा की बेमोसमी पावसाचा परिणाम होत आहे. यावर्षी कांदा पिकावर प्रकर्षाने जाणवला आहे.यंदा कांदा पिकाचे उत्पादन हे एकरी 80 ते 90 क्विंटल झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

सरासरी एकरी 180 ते 190 क्विंटल उत्पादन मिळणारे कांदा पीक यंदा अर्ध्यावर आल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता असून शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडणार आहे. मिळालेल्या उत्पादनातून पिकासाठी केलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती शेतकरी वर्ग बाळगून बसला आहे. त्यातही करोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने भाजीपाला पिके करावी की नाही या संभ्रमावस्थेत शेतकरी वर्ग आहे.

भाजीपाला पिके करण्यासाठी प्रथम पैसे आगाऊ देत रोपवाटिकेमध्ये पिकांचे रोपे नोंदवावी लागतात. त्यानंतर रोपे मिळतात व ही बाब खर्चिक आहे. त्यानंतर रोपे लागवड करून पिके घेतली जातात. पुढील खर्च हा एकरी लाखात आहे एवढे करून सुद्धा जी भीती आहे ती म्हणजे लॉकडाऊन झाले आहे. आपला शेतमाल कुठे विकायचा? पाळे खुर्द परिसरात तसेच संपूर्ण कळवण तालुक्यात कांदा पिका नंतर भाजीपाला पिके म्हणजेच टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, वालपापडी, गवार, कोथिंबीर, द्राक्ष, काकडी, टरबूज, खरबूज आदी फळे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु करोना संसर्गाचा प्रादुर्भाव तसेच कोविड 19 नियमांचे पालन यामुळे शेतकरी राजा चिंचेत आहे.आपला खर्च वाया जाईल आपण कर्जबाजारी होऊ का ? अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

कोविड-19 ची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा खेळ दीड वर्षांपासून चालू असून मागील वर्ष सुद्धा पूर्ण ह्याच स्थितीत गेले पहिले काही दिवस शेतकर्‍यांचा गोंधळ उडाला. शेतमाल विकण्याची व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे भाजीपाला व फळे बांधावर सडत आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांचे अवसान गळाले तर काहींनी सावरत मार्ग काढले. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी कळवण शहरात जाऊन थेट ग्राहकांना दारोदार शेतमाल विकायचे ठरविले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी यशस्वी ठरले. ग्राहकही समाधानी झाले.

करोनामुळे बाहेर पडता येत नाही. परंतु कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी आहे. ते मजूर न लावता स्वतः शेती करतात तसेच काही इतर शेतकरी कुटुंब असे आहेत की स्वतः जमीन कसतात मग त्यांच्या पुढे हाही एक मनुष्य बळाचा प्रश्न उभा राहिला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर भाजीपाला लागवड करावी का ह्या संभ्रमावस्थेत कळवण तालुक्याचा शेतकरी अडकला आहे.

फळे ट्रॅक्टर व पिकअप मधून फळे विक्री

कळवण शहरात शेतकर्‍यांनी मागील वर्षी अक्षरशः फळे घरोघरी जाऊन विकली लॉकडाऊन नंतर काही शेतकरी व्यापार्‍यांवर अवलंबून न राहता स्वतः भाजीपाला व फळे विकत आहेत यंदा हीच परिस्थिती कळवण शहरात दिसून येत आहे. टरबूज, खरबूज, द्राक्ष, ट्रॅक्टर व पिकअप अशा वाहनातून शेतकरी विक्री करीत आहे. सुरुवातीस शेतकर्‍यांच्या मनात धाकधूक होती पण शेतमाल विकला जात आहे. ही आनंदाची बाब आहे. पण शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे. पण आता नेमकी नैसर्गिक आपत्ती तसेच करोना विषाणू संकट बेमोसमी अवकाळी पाऊस असे अनेक संकटे झेलत पूर्ण देशाचे पोट भरणारा शेतकरी राजा आता हतबल झाला आहे.

पिकाचे सरासरी उत्पन्न घटले असून नेमके पीक कोणते घ्यावे ह्या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. तसे कळवण तालुका सधन समजला जातो, मात्र मागील दोन वर्षांपासून इथला शेतकरी इकडे आड तिकडे विहीर या अवस्थेत आहे. जर अजून लॉकडाऊन वाढला परिस्थिती निवळली नाही तर काय करावे? यामुळे कळवण तालुक्यातील शेतकरी वर्ग विचार करीत असून नेमका भाजीपाला लागवड करावी की नाही. अजून संकटात एक भर म्हणजे पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण असून संपूर्ण कळवण तालुकाभर अवकाळी पाऊस पडला आहे अजून काही दिवस वातावरण असेच राहील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. आता नेमके कोणते पीक करावे, की, करू नये या संभ्रमात कळवण तालुक्याचा शेतकरी अडकला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com