पर्यटकांच्या संख्येत घट

पर्यटकांच्या संख्येत घट

नाशिक । प्रतिनिधी

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या मनातील भीती वाढू लागली आहे. वाढत्या करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनची चर्चाही होऊ लागल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून पंचवटी परिसरातील धार्मिक स्थळांवर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. धार्मिक पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांमुळे पंचवटीतील गोदाघाट परिसर आणि तपोवन परिसरातील व्यवसाय वाढत असतात. मात्र पर्यटक कमी झाल्याने त्याचा परिणाम व्यवसायांवर जाणवत आहे.

करोनाकाळात लॉकडाऊन करण्यात आले त्यावेळी येथील व्यवसाय ठप्प झाले होते. अनलॉकनंतर गोदाघाट परिसरातील व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले होते. त्यात येथील सुरू असलेल्या मुख्य रस्त्यावरील खोदकामाची आडकाठी येत होती.

अनलॉकनंतर काही दिवसांनी धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. बाहेरगावाहून येणार्‍या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथील पार्किंगमध्ये वाहने वाढली होती. फुले, फुलांचे हार, प्रसाद, पूजेचे साहित्य आदींसह विविध व्यावसायिकांच्या दुकानांत ग्राहक वाढले होते. असे असताना करोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केल्याने देशभरातील विविध राज्यांतून येणारे पर्यटक कमी होऊ लागले. लॉकडाऊन झाले तर काय करायचे, अशीही भीती व्यक्त केली जात असल्यामुळे ही गर्दी घटल्याचे बोलले जात आहे.

रामकुंड परिसरात होणार्‍या धार्मिक विधींसाठी भाविक येत असले तरी दिवसभर त्यांचीही संख्या मर्यादित आहे. सकाळच्यावेळी रामकुंड परिसरात गर्दी होते. या गर्दीत करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची पाहिजे तशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. येथील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी खास ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच जण त्या सूचनांचे पालन करत नाहीत. मास्क वापरणे अनिवार्य असतानाही अनेकांच्या तोंडावर मास्क नसतात. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर येथे भर देण्याची गरज असल्याचे येथील व्यावसायिक सांगत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com