नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

राज्य शासनाची परवानगी नसतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परस्पर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. हा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारावर घेतला, याचा खुलासा करण्याचा आदेश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला आहे.

महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी समोर आल्याने पुणे विद्यापीठाने यासाठी समिती नेमली. समितीच्या अहवालानुसार सुरक्षेच्या नियमांचे पालन करून ११ जानेवारीपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, आता याच निर्णयामुळे खुलासा करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. उच्च शिक्षण विभागाने याबाबत पुणे विद्यापीठाला गुरुवारी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी प्रत्यक्ष वर्ग हे "यूजीसी'ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाच्या मान्यतेने सुरू करणे आवश्यक होते.

मात्र, पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात ११ जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने कोणतेही आदेश दिले नसताना थेट वर्ग सुरू करण्याचा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारे घेतला, याचा खुलासा करा, असा आदेश उच्च शिक्षण संचालकांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिला आहे.

हे पत्र आल्यानंतर विद्यापीठाने सुधारित आदेश काढत महाविद्यालये सुरू करण्याची तारीख शासनाच्या आदेशानंतर कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.