नाशिक । Nashik

शहरातील शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवजयंती साजरा करणार्या मंडळांना दिले.

शिवजन्मोत्सवा निमित्त पारंपारिक मिरवणूकांना करोना नियमांचे पालन करत परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी रविवारी (दि.२४) शिवजन्मोत्सव समिती व शहरातील विविध मंडळाच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सर्व मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती,नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण, भाई समाज मित्र मंडळ,शिकसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायाम शाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंडळांच्या वतीने पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शासनाने जाहिर केलेल्या तारखेनुसार शिवजन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व शोभा यात्रा काढून उत्साहात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिरवणुकीस परवानगी मिळण्याबाबत अडचणी आहे.

त्यामुळे सर्व मंडळांच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शासकीय तारखेनुसार जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षी महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबाबत अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली.

यावेळी भुजबळ म्हणाले की, नाशिक मध्ये सध्या करोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा करोना वाढणार नाही याची काळजी आपण सर्वांना घ्यावी लागणार आहे.

त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शिवजन्मोत्सव मिरवणुका बाबत करोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.