कौतुकास्पद ! एकलहरे गावात 'घर तिथे ऑक्सिजन बेड'चा निर्णय

कौतुकास्पद ! एकलहरे गावात 'घर तिथे ऑक्सिजन बेड'चा निर्णय
USER

नाशिक । Nashik

एकीकडे कोरोनाने जगण मुश्कील केल असताना नाशिक तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता असताना एकलहरे ग्रामपंचायतीने भविष्यात शौचालयाप्रमाणेच एक ऑक्सिजन बेड तयार करणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे पंचायतीने केवळ बंधनकारक केले नाही तर बेडची व्यवस्था करणाऱ्याला घरपट्टीमध्ये सूटही देण्याचा निर्णय घेतलाय.

एकलहरे ग्रामपंचायतीच्या या निर्णयामागे कारण आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्या रत्नाबाई दिलीप सोनवणे यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण करोनासोबत झुंज देत असताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मनाला चटका लाऊन गेली.

त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या व्यक्तीला नवीन घर बांधायचे असेल त्यांनी एक ऑक्सिजन बेड तयार करण्याची सूचना केली. तसेच हा बेड बांधल्यानंतर त्यांना घरपट्टीमध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी निवेदनाद्वारे केली.

सागर जाधव यांनी केलेल्या क्रांतिकारी सुचनेचे सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. सदर सुचनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मासिक सभेत ठराव करण्यात आला. यामुळे भविष्यात रुग्णालयात ऑक्सिजन मिळेलच यावर अवलंबून न राहता जीव वाचविण्यासाठी एक आधार होणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच मोहिनी जाधव यांना विश्वास आहे.

.सरपंच मोहिनी जाधव यांनी ठराव बहूमताने मंजूर करून हीच रत्नाबाई सोनवणे ह्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. सदर मासिक सभेला ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य निलेश धनवटे, संजय ताजनपुरे, कांताबाई पगारे, सुरेखा जाधव, शोभा वैद्य, निर्मला जावळे, सुरेश निंबाळकर, विश्वनाथ होलिन आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com